एखादा माणूस जीवनातील अनेक संकटे सहन करू शकतो, पण विश्वासघात आणि फसवणूक सहन करणे अत्यंत कठीण असते, असे म्हटले जाते. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातल्या झाशी जिल्ह्यातील मऊरानीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे दु:खी झालेल्या एका पतीने आत्महत्या केली. पण आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला. त्यात त्याने आपली व्यथा आणि गंभीर आरोप केले. डालचंद्र नावाच्या या व्यक्तीने पत्नीच्या फसवणुकीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहील्यानंतर अंगावर काटा आल्या शिवाय राहाणार नाही.
मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये डालचंद्र यांनी म्हटले आहे, माझ्यासारखा विश्वासघात कोणालाही सहन करावा लागू नये. मला मरायचे नव्हते. पण नाईलाज आहे. मी खूप दुखावला गेलो आहे. मना पासून ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच फसवले असं तो यात म्हणतो. लहचूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इमलौटा गावचे रहिवासी असलेल्या डालचंद्र अहिरवार यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. त्यांना 8 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी आहे. डालचंद्र हे खासगी नोकरीसाठी हरियाणातील बहादूरगढ येथे पत्नी आणि मुलांसोबत राहत होते.
नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
मृतकाच्या मामेभावाने दिलेल्या माहितीनुसार,डालचंद्र यांना काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी घरमालकासोबत प्रेमसंबंधात असल्याचे समजले. याला विरोध केल्यावर पत्नीने त्यांना त्याच व्यक्तीकडून मारहाण करवून घेतली. मोबाईलही काढून घेतला. या घटनेनंतर डालचंद्र गावात परतले. तर त्यांची पत्नी माहेरी निघून गेली. डालचंद्र यांनी पत्नीच्या नावावर खरेदी केलेली जमीन ती विकण्याचा विचार करत होती. पत्नीच्या कुटुंबानेही तिला पाठिंबा दिला. या सर्व गोष्टींमुळे व्यथित होऊन डालचंद्र यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
डालचंद्र यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा विष प्राशन केले. त्यांना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी, मृतकाच्या साल्याने (Brother-in-law) वेगळा दावा केला आहे. डालचंद्र दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा आणि त्यामुळेच त्यांच्यात वाद होता. पत्नीचे कोणाशीही प्रेमसंबंध नव्हते, हा खोटा आरोप आहे. मऊरानीपूर पोलीस स्टेशनच्या स्टेशन इंचार्ज मुकेश कुमार सोळंकी यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले आहे. व्हिडिओबद्दल कोणतीही माहिती किंवा तक्रार (FIR) प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. तक्रार मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world