
प्रेमभंग झाल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसल्यानंतर छातीत दुखू लागले तर हलक्यात घेऊ नका. कारण तुम्हाला ब्रोकन हार्ट सिंड्रोमने ग्रासले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनावर अचानक ताण आल्याने जीव घाबराघुबरा होतो, छातीत दुखू लागतं याला ‘कार्डिओमायोपॅथी' किंवा ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी' असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असेही म्हणतात. या सिंड्रोममध्ये रुग्णातील लक्षणे ही हार्ट अॅटॅक आल्याप्रमाणे दिसतात. अपघात, मोठा आर्थिक तोटा, मालमत्तेचे मोठे नुकसान, अतिप्रिय व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू अशा घटनांमुळे मनाला वेदना होतात, मानसिक ताण निर्माण होतो ज्यामुळे एखाद्याला ब्रोकन हार्ट सिंड्रोमचा सामना करावा लागू शकतो.
नक्की वाचा: Paratha vs Poha: पोहे की पराठे? हेल्दी नाश्त्यासाठी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?
काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम
मनाला धक्का बसेल अशी एखादी घटना घडल्यानंतर, ती आपल्या कानावर पडल्यानंतर काही जणांमध्ये एक विशिष्ट स्थिती निर्माण होते. टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथीमध्ये अचानक आलेल्या ताणामुळे हृदयाचे स्नायू काहीसे कमजोर होता. हे बहुतेकदा एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन, मोठा अपघात किंवा जबरदस्ती भीती वाटू लागल्याने अथवा प्रेमभंग झाल्यामुळे होते. असं झाल्याने हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम करणाऱ्या तणाव संप्रेरकांची अचानक वाढ होते. या स्थितीचे नेमके कारण सांगता येत नसले तरी जबर धक्का हे याचे मूळ असते. या सिंड्रोममुळे छातीत दुखणे, दम लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, गरगरणे किंवा बेशुध्द पडणे, घाम येणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसायला लागतात. ही स्थिती तात्पुतरती असली तरी कधीकधी यामुळे हार्ट फेल्युअरची शक्यताही नाकारता येत नाही असे, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले. अशावेळी रुग्णाला ICU त दाखल करण्याचीही वेळ येऊ शकते.
नक्की वाचा: How To Kill Cockroaches At Home: फक्त 10 रुपये खर्च आणि झुरळं होतील गायब, हा छोटासा पांढरा तुकडा करेल कमाल
ब्रोकन हार्ट सिंड्रोम झाल्यास उपचार काय आहेत?
'ब्रोकन हार्ट सिंड्रोम' (ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी) च्या रुग्णावर उपचार करत असताना त्याच्या हृदयाचे कार्य पूर्वीप्रमाणे नीट व्हावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले की, यासाठी डॉक्टर हृदयावरील ताण कमी करण्यासाठी ठराविक औषधे घेण्याचा सल्ला देऊ शकतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णाच्या हृदयाची नियमित तपासणी आणि इकोकार्डियोग्राम करणे महत्त्वाचे ठरते. रुग्णाला लवकर बरे वाटावे यासाठी समुपदेशन, योग, ध्यान धारणा आणि श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासारख्या तंत्रांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, ताजी फळे, भाज्या, तृणधान्ये आणि डाळींचा समावेश असलेला निरोगी आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि धूम्रपान किंवा अल्कोहोल सेवन टाळणे गरजेचे असते. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाला बरे करण्यात मदत होते असेही तज्ज्ञांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world