
White Hair Remedies: अकाली केस पांढरे होणे ही सामान्य समस्या आहे. बदलत्या लाइफस्टाइलनुसार आता पंचविशी-तिशीमध्येच लोक पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, अपुरी झोप आणि शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता यासह अन्य गोष्टी केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. काही नैसर्गिक औषधोपचारांची मदत घेऊन तुम्ही या समस्येतून सुटका मिळवू शकता. प्रसिद्ध योगगुरू हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर काही नैसर्गिक आणि रामबाण उपचारांची माहिती सांगितली आहे, ज्याद्वारे केस मुळासकट काळे होण्यास मदत मिळू शकते.
केस मुळासकट काळे करण्यासाठी 5 प्रभावी उपाय | Hair Care Tips In Marathi
जास्वंदाचे फुल आणि दह्याचे पॅक (Hibiscus Yogurt Pack)
डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, जास्वंद केसांसाठी फायदेशीर मानले जाते. याद्वारे स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केसांचे मूळ मजबूत होतील. एका भांड्यामध्ये चार चमचे दही आणि 1/4 कप जास्वंदाच्या फुलाची पावडर घेऊन पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर स्कॅल्पसह केसांवर लावा. 30-40 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. याद्वारे केसांना नैसर्गिक रंग मिळेल.
भृंगराज आणि आवळा तेल (Bhringraj and Amla Oil)
भृंगराज आणि आवळा दोन्ही गोष्टींमुळे केस काळे आणि घनदाट होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही तेल समप्रमाणात एकत्रित घेऊन केसांना लावा. स्कॅल्पचा हलक्या हाताने मसाज करा. सकाळी केस स्वच्छ धुऊन घ्या. या तेलांमुळे केसांची वाढ होईल आणि पांढऱ्या केसांचीही समस्या उद्भवणार नाही.
अश्वगंधा चहा (Ashwagandha Tea)
अश्वगंधा एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे शरीरामध्ये मेलेनिनचा स्त्राव होण्यास मदत मिळते. यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंगही मिळतो. एक कप पाण्यात एक चमचा अश्वगंधा पावडर मिक्स करा, 10-15 मिनिटे पावडर उकळू द्यावी. पाण्यामध्ये थोडेसे मध, लिंबू मिक्स करा. चहा तयार झाल्यानंतर गाळून प्यावा. योगगुरूंच्या मते अश्वगंधाचा चहा प्यायल्यास ताण कमी होईल आणि केसगळतीचीही समस्या दूर होईल.
योगासन आणि प्राणायाम (Inversion Asanas)
हंसा योगेंद्र यांनी पुढे असंही म्हटलंय की, काही योगासनांचा सराव केल्यास डोक्याच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल, ज्यामुळे केसांचे मूळ मजबूत होतील आणि पांढऱ्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. विपरीतकरणी मुद्रा, सर्वांगासन, हस्तपादासन आणि अधोमुख श्वानासन यासारख्या आसनांचा सराव केल्यास स्कॅल्पच्या भागामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. यामुळे केसगळतीची समस्या दूर होईल.
कॉपर आणि ओमेगा-3 युक्त आहार (Copper and Omega-3 Rich Foods)
तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळेही केसांवर परिणाम होतात. डाएटमध्ये काजू, बदाम, मशरूम, दही, पनीर, केळ, अक्रोड, अळशीच्या बिया, पालक, ब्रोकोली यासारख्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करावा. याद्वारे शरीराला कॉपर, व्हिटॅमिन-B आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा पुरवठा होईल; ज्यामुळे केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होईल.
केसांची देखभाल करताना या गोष्टींचीही काळजी घ्यावी
हंसा योगेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तणावमुक्त राहा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी. पौष्टिक आहार, योग आणि नैसर्गिक औषधोपचारांद्वारे केसांशी संबंधित समस्यांवर उपाय मिळवावा.
(नक्की वाचा: Hair Care Tips: तुमचा एकही केस गळणार नाही, जावेद हबीबने सांगितला चमत्कारी उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world