- डॉ. अपर्णा गोविल भास्कर
Health News: हर्नियाचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. सुरुवातीला वेदना नसल्यामुळे किंवा गाठ लहान असल्यामुळे सध्या काही त्रास नाही, असे म्हणत लोक उपचार पुढे ढकलतात. पण हर्निया हा आपोआप बरा होणारा आजार नाही. योग्य वेळी उपचार न केल्यास हा आजार गंभीर तसेच कधी-कधी जीवघेणाही ठरू शकतो.
हर्नियाचे प्रकार | Hernia Types
- गुंतागुंतीची स्थिती नसलेला हर्निया (Uncomplicated Hernia) म्हणजे जेव्हा आतडी पेरिटोनियममध्ये बाहेर येतात, पण अडकत नाहीत.
- अडकलेल्या स्थितीतील(Incarcerated) हर्निया : जेव्हा आतडी कमकुवत जागेतून बाहेर येऊन तेथेच अडकते आणि पुन्हा आत जात नाही, या स्थितीस अडकलेला हर्निया म्हणतात.
- अडकलेल्या हर्नियाला रक्तपुरवठा खंडित होतो आणि यामुळे गँगरीन होऊ शकते, या स्थितीस स्ट्रॅन्ग्युलेटेड हर्निया असे म्हणतात.
स्ट्रॅन्ग्युलेटेड हर्निया आणि इन्कार्सरेटेड हर्निया या दोन्ही स्थिती गंभीर मानल्या जातात, या स्थितीत त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. याच कारणामुळे डॉक्टर सर्व प्रकारच्या हर्नियासाठी मग तो साधा असो वा गुंतागुंतीचा, शस्त्रक्रियेची शिफारस करतात. रुग्णाला कोणताही धोका नसतानाही शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. शस्त्रक्रियेद्वारे स्नायूंच्या कमकुवत जागेतून बाहेर आलेल्या अवयवाला त्याच्या मूळ जागी पुन्हा आणले जाते, आधारासाठी जाळीचा (मेश) वापर केला जातो.
हर्नियाचे उपचार | Hernia Treatment
हर्नियाची शस्त्रक्रिया ओपन पद्धतीने किंवा लॅप्रोरोस्कोपिक पद्धतीने केली जाऊ शकते. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सहसा 36 ते 72 तासांत घरी जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये रुग्णाला शस्त्रक्रियेच्या दिवशीच घरी पाठवले जाते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला स्थानिक किंवा स्पाइनल अॅनेस्थेशिया दिला जातो, ज्यामुळे शरीराचा खालचा भाग बधीर होतो. क्वचितच सामान्य ॲनेस्थेसियाची आवश्यकता भासू शकते.ओपन सर्जरीमध्ये तज्ज्ञ हर्निया टाके किंवा जाळीच्या मदतीने दुरुस्त करतात. तर लहान छिद्र पाडून कॅमेराच्या मदतीने आधुनिक शस्त्रक्रिया केली जाते. साधारणपणे अवयवाला अतिरिक्त आधार देण्यासाठी एक जाळी (मेश) लावली जाते. ही जाळी हर्निया पुन्हा होण्यापासून प्रतिबंधित करते. ओपन शस्त्रक्रिया क्वचितच केली जाते आणि ती खूप मोठ्या किंवा गुंतागुंतीच्या, पुन्हा उद्भवणाऱ्या हर्नियासाठी राखून ठेवली जाते.
(नक्की वाचा: Pomegranate Benefits: रोज डाळिंब खाल्ल्यास काय होते? त्वचेवर कोणते परिणाम होतील? डाळिंब कोणी खाऊ नये)
लॅप्रोस्कोपिक हर्निया दुरुस्ती
लॅप्रोस्कोपिक हर्निया दुरुस्ती सामान्यतः जनरल ॲनेस्थेशिया देऊन केली जाते. लॅप्रोस्कोपिक हर्निया दुरुस्तीमध्ये सर्जन रुग्णाच्या पोटाचा भाग कार्बन डायऑक्साइड वायूने फुगवतात. यामुळे सर्जनला अवयवांचे अधिक स्पष्ट दृश्य पाहण्यास मदत होते. त्यानंतर काही सेंटीमीटर आकाराचे छिद्र केले जातात, ज्यामुळे पोटात प्रवेश मिळतो. हर्नियाची दुरुस्ती करताना लॅप्रोस्कोपच्या मदतीने डॉक्टरांना शस्त्रक्रियेत मदत होते.
लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सहसा लवकर बरा होतो. संशोधनातून असे दिसून आलंय की, बहुतेक रुग्ण ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत एक आठवड्यातच सामान्य कामास सुरुवात करतात.
(नक्की वाचा: Health News: रात्री किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? सतत होणाऱ्या लघवीच्या समस्येपासून कशी सुटका मिळावावी? वाचा उपाय)
आजकाल रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे देखील हर्नियाची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. यामुळे अधिक चांगले दृश्य मिळते आणि सर्जनसाठी ती अधिक सोयीस्कर ठरते. गुंतागुंतीच्या हर्नियासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे बहुतेकदा हर्नियाचा आकार, प्रकार आणि त्याचे स्थान यावर अवलंबून असते. याव्यतिरिक्त डॉक्टर शस्त्रक्रियेचा प्रकार सुचवण्यापूर्वी रुग्णाचे वय, आरोग्य आणि जीवनशैलीचा विचार करतात. जर तुम्ही हर्नियाने त्रस्त असाल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
(डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक, हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेटाहील - लॅप्रोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर, मुंबई; सैफी, अपोलो आणि नमः हॉस्पिटल्स, मुंबई)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

