
Health News: दिवसभर ब्रा घालणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य मानले जात नाही. विशेषतः रात्री सुद्धा ब्रा घालून झोपण्याची सवय असेल तर अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सवयीमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया, त्वचेशी संबंधित समस्या, झोपेवरही दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणंय. रात्री झोपताना ब्रा का काढावी आणि असे न केल्यास कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया..
डॉ. सोनाली गुप्ता, सीनिअर गायनेकोलॉजिस्ट, (एक्स -फोर्टिस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा) यांनी सांगितले की, रात्री ब्रा न घातल्यास आरोग्यावर परिणाम होतात का?असा प्रश्न माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या असंख्य महिला विचारतात. महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न डोकावणे साहजिक आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात विश्रांती, आरोग्य आणि आत्मविश्वास यामध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. रात्री झोपताना ब्रा घालणे योग्य की अयोग्य? याबाबत डॉ. सोनाली यांनी नेमके काय सांगितलंय, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
रात्री झोपताना ब्रा का घालू नये? (Why Sleeping In A Bra Is Dangerous In Marathi)
1. बुरशीजन्य संसर्ग आजार आणि खाज येण्याचा धोका (Risk of Fungal Infection And Itching)
घट्ट स्वरुपातील ब्रा रात्रभर घालून झोपल्यास छातीच्या भागाजवळ घाम येऊ शकतो. यामुळे बुरशीजन्य संसर्ग आजारांचा धोका वाढू शकतो आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते. खाज येण्याच्या समस्येमुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
2. रॅशेज आणि काळे डाग (Rashes And Dark Spots Issue In Marathi)
दिवसभर घातलेली ब्रा रात्री झोपताना काढणे आवश्यक आहे. असे न केल्यास छातीच्या भागातील त्वचेवर रॅशेज, लाल चट्टे येणे आणि यामुळे खाज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर काळे डाग येऊ शकतात.

3. अॅलर्जीची समस्या (Allergy Issues In Marathi)
दीर्घकाळ काळ ब्रा घालून राहिल्यास घामामुळे त्याचे कापड ओले होते. ओली झालेली ब्रा न काढल्यास त्वचा कोरडी होणारच नाही. ओलाव्यामुळे बॅक्टेरियांमुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतील. यामुळे पुरळ येणे आणि अॅलर्जी देखील होऊ शकते.
(नक्की वाचा: Bra Full Form In Marathi: BRA शब्दाचा फुलफॉर्म माहितीय? 99% महिलाही अजाण, नाव ऐकून व्हाल आश्चर्यचकित)
4. रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येणे (Effect On Blood Circulation In Marathi)
रात्रभर घट्ट ब्रा घातल्यास छातीच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतील. यामुळे छातीत दुखणे, सूज येणे किंवा सून्नपणा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
5. झोपेवर दुष्परिणाम होणे (Disturbed Sleep)
रात्री झोपताना आरामदायी कपडे घालणे अतिशय आवश्यक आहे. घट्ट कपडे घालून झोपल्यास उकाडा जाणवेल, घामामुळे अवस्थता निर्माण होईल. यामुळे झोपेवर दुष्परिणाम होतील. वारंवार झोप मोडल्यास अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवेल.
6. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका (Breast Cancer Risk)
रात्री झोपताना ब्रा काढल्यास छातीच्या भागातील स्नायूंना आराम मिळेल आणि या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया देखील योग्य पद्धतीने होईल. कित्येक रीसर्चमधील माहितीनुसार रात्री ब्रा घालून झोपल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. दरम्यान या विषयावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. पण रात्रभर ब्रा घालून झोपणे टाळावे, यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील टाळल्या जाऊ शकतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world