Rat Bite Treatment: रेबीज हा एक असा आजार आहे जो प्राणी, विशेषतः कुत्रे आणि कुत्र्यासारख्या अन्य प्राण्यांच्या चावण्याने होतो. जर यावर योग्य वेळी उपचार केले नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच रेबीज पसरवणाऱ्या प्राण्यांनी चावल्यानंतर लोकांनी त्वरित लस घ्यावी आणि योग्य तपासणी करावी, असा सल्ला दिला जातो. आता मनात प्रश्न येतो की माकड आणि कुत्रा चावल्यावर त्वरित रेबीजचे इंजेक्शन घेण्यास सांगितले जाते, पण जर उंदीर चावला तर काय करावे?
उंदीर चावल्यावर रेबीजचे इंजेक्शन घ्यावे का? अशा परिस्थितीत रेबीजचे इंजेक्शन घेणे आवश्यक असते का? याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणाही जीवाला धोका निर्माण करू शकतो. तज्ज्ञ काय म्हणाले? जाणून घेऊया...
डॉ. पूनम संभाजी या एक सल्लागार बालरोगतज्ज्ञ (Consultant Pediatrician) आहेत. यासोबतच त्या दैनंदिन जीवनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरेही देतात. एका व्हिडीओमध्ये डॉ. पूनम यांनी रेबीजसंदर्भातील प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
(नक्की वाचा: Joint Pain In Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखी,गुडघेदुखी वाढलीय? पेनकिलरऐवजी प्या 'हा' चहा, रीसर्चमधील मोठी माहिती)
उंदीर चावल्याने रेबीज होतो का?
डॉ. पूनम यांनी सांगितले की, उंदीर चावल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. जसे की रॅट-बाइट फीवर, ताप, त्वचेवर लाल पुरळ येणे, सांधेदुखी किंवा जखमेत खोलवर संसर्ग होणे. काही प्रकरणांमध्ये लॅप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) देखील होऊ शकतो, ज्यामध्ये कावीळ आणि किडनीचा त्रासही होऊ शकतो. डॉ. पूनम यांच्या मते आजूबाजूला आणि बाजारात फिरणाऱ्या तसेच घरात फिरणाऱ्या उंदरांच्या चावण्याने रेबीजचा धोका नसतो. म्हणूनच उंदीर चावल्यावर रेबीजचे इंजेक्शन देणे आवश्यक नाही.
उंदीर चावल्यावर काय करावे?
- जखम वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान 15 मिनिटे स्वच्छ धुवा आणि कोणतेही अँटीसेप्टिक लावा.
- जखमेवर घट्ट पट्टी बांधू नका, हलकी पट्टी बांधावी.
- डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि टिटॅनसचे इंजेक्शन घ्या.
- जर जखम खोल असेल किंवा संसर्गाचा धोका जास्त असेल तर डॉक्टर अँटीबायोटिक औषधेही देऊ शकतात.
हा लेख डॉ. पूनम संभाजी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील माहितीवर आधारित आहे. डॉ. पूनम संभाजी यांनी बाल आरोग्यामध्ये डिप्लोमा (DCH) आणि MBBS केले आहे आणि बालरोगतज्ज्ञ म्हणून जवळपास 19 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या स्वतःचे क्लिनिक चालवत आहेत.
(नक्की वाचा: Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world