प्रसाद शिंदे, अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक शिस्तीसाठी एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक वादात महिलांचा उद्धार करून शिवीगाळ करणाऱ्यांना आता 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ भाषणे नव्हे, तर कृतीतून बदल घडवणे होय, हे कोळगावच्या रणरागिणींनी दाखवून दिले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष महिला ग्रामसभेत, गावातील सार्वजनिक शिस्त बिघडवणाऱ्या आणि महिलांचा अनादर करणाऱ्यांविरुद्ध कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.
शिवीगाळ करणाऱ्यांना चाप
गावातील अंतर्गत वाद असो किंवा सार्वजनिक ठिकाण, जर कोणी 'आई-बहिणी'चा उद्धार करून शिवीगाळ करताना आढळले, तर त्या संबंधित व्यक्तीला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. महिलांच्या सन्मानासाठी आणि तरुण पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
स्वच्छतेसाठीही कडक पावले
केवळ शिवीगाळच नाही, तर गाव स्वच्छ ठेवण्यासाठीही ग्रामसभेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या घर किंवा दुकानासमोर कचरा आढळल्यास संबंधिताला 100 रुपये दंड केला जाईल. जर कोणी अस्वच्छता पसरवत असेल, तर त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दिल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल.
(नक्की वाचा- Pune News: पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी?)
महिलांच्या कार्याचा गौरव
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अंगणवाडी सेविका शकुंतला देशमुख होत्या. सभेची सुरुवात शेती आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या गौरवाने करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी महिलांना शुभेच्छा देताना सांगितले की, "पुढील वर्षी हा सण अधिक व्यापक स्वरूपात साजरा केला जाईल आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जातील."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world