
योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News: अकोल्यात 50 टक्क्यांहून अधिक भाजलेली रूपाली अनिल खंडारे या महिलेच्या घटनेने खळबळ उडाली आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना फोन करून रुग्णालयात जाऊन रूपालीच्या प्रकृतीची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
नेमकं काय आहे प्रकरण?
अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या देवी खदान परिसरात राहणारी रूपाली यांचा काही वर्षापूर्वी अनिल खंडारे यांच्याशी विवाह झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, 24 सप्टेंबर रोजी सकाळी रूपाली घरातील कुडा-कचरा पेटवत असताना तिच्या अंगावर आग लागली आणि ती गंभीररीत्या भाजली. मात्र, तिच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला सांगितले की, रूपालीला तिच्या पतीनेच पेटवून दिले.
घटनेनंतर पतीनेच रूपालीला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. शिंदे सेनेचे माजी आमदार बाजोरिया आणि त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रूपालीची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, रूपालीची तब्येत गंभीर असून ती बोलण्याच्या स्थितीत नाही.
Pune News: 30 वर्षानंतर पुण्यात डबलडेकर बस, कुठे कुठे धावणार? जाणून घ्या सगळी माहिती
या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सत्यता तपासल्यानंतरच घटनेमागचे खरे कारण समोर येणार आहे. याच दरम्यान पोलिस अधीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सखोल चौकशी करून सर्व बाबी स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
यादरम्यान अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनवणे यांनी सांगितले की, रूपालीची प्रकृती चिंताजनक असली तरी तिच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस मात्र सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world