
मंगेश जोशी, जळगाव: महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राचे भले करु शकत नाही. केंद्रात तुम्हीं नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान केले,राज्यातही महायुतीचे सरकार आणा हे डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्राला नंबर एकवर घेऊन जाईल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. जळगावच्या फैजापूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. महायुतीचेच सरकार महाराष्ट्राला विकासाचा मार्ग दाखवेल, असे म्हणत राज्यात आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
काय म्हणाले अमित शहा?
'१० नोव्हेंबर हा महत्वपूर्ण आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभरात आजचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध करुन भगवा फडकवला होता. महाविकास आघाडी यांचा एकच उद्देश आहे, कोणत्याही प्रकारे सत्तेत येणे. दुसरीकडे भाजप, शिवसेना राष्ट्रवादीचा उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर महाराष्ट्राला देशातील नंबर एकचे राज्य बनवायचे आहे. राहुल गांधी आमच्या सावकरांचा विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींकडून सावरकर आणि बाळासाहेबांनाबद्दल दोन चांगले शब्द बोलायला लावा, ते बोलणार नाहीत. आमची युती महाराष्ट्र संस्कृतीच्या रक्षणासाठी तयार झाली आहे. आमची युती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षांची युती आहे,' असं अमित शहा म्हणाले.
काँग्रेसवर निशाणा
'महाराष्ट्रात 10% मुसलमानांना आरक्षण द्यावे अशी मागणी केली जाते याचाच अर्थ 50% आरक्षण मुसलमानांना मिळाला आहे. दहा टक्के मुसलमानांना आरक्षण द्यायचं असेल तर दलित ओबीसींच्या आरक्षण टाकून मुसलमानांना द्यावे लागेल. दलित ओबीसी आदिवासींचे आरक्षण कट करून मुसलमानांना देण्यास तुम्ही सहमत आहात का? भाजपाचा एकही लोकसभा व विधानसभा प्रतिनिधी सभागृहात असेल तोपर्यंत अल्पसंख्याकांना 10 आरक्षण देणार नाही, असा इशाराही अमित शहा यांनी दिला. तसेच काँग्रेस, शरद पवारांनी 70 वर्ष राममंदिराचा मुद्दा रखडवला.२०१९ मध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर राममंदिर झाले. साडे पाच हजार वर्षानंतर रामलल्लाने आपल्या भव्य मंदिरात दिवाळी साजरी केली,' असंही शहा पुढे म्हणाले.
दरम्यान, 'युती सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर महाविकास आघाडीने विरोध केला. राममंदिर, ट्रिपल तलाक, 370 चाही विरोध केला आघाडीचे सरकार महाराष्ट्राचे भले करु शकत नाही. केंद्रात तुम्हीं नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान केले, राज्यातही महायुतीचे सरकार आणा. हे डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्राला नंबर एकवर घेऊन जाईल,' असे म्हणत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही अमित शहांनी केले.
नक्की वाचा: आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world