
ज्या महाराष्ट्र विधीमंडळामध्ये कायदे तयार केले जातात त्याच विधीमंडळात ज्यांचा कायद्याशी कायम छत्तीसचा आकडा राहिलाय अशा मंडळींनाही प्रवेश करताना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) नुसार, 2024 साली झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या नवीन विधानसभेत 118 आमदार, म्हणजेच 41% लोकप्रतिनिधी, असे आहेत ज्यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोद आहे. यापैकी तिघांवर हत्येचा, 11 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि दहा जणांवर महिला अत्याचारासारखे गंभीर आरोप आहेत ज्यातील एकावर बलात्काराचा आरोप आहे. पण ही बाब महाराष्ट्रासाठी नवीन नाही, यापूर्वीही अनेक गुन्हेगारांना विधीमंडळात आमदार म्हणून शपथ घेताना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. गँगस्टर अरुण गवळी याची नुकतीच नागपूरच्या तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर मुंबईतील भायखळ्यातील कुप्रसिद्ध दगडी चाळीत अरुण गवळीचे जंगी स्वागत झाले. शिवसैनिकाच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेप झाली असून याच प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.
नक्की वाचा: 'डॅडी' 18 वर्षांनंतर बाहेर येणार! शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन
पापक्षालनासाठी राजकारणाच्या गंगेत डुबकी
पापक्षालनासाठी गंगेत स्नान करावे असे सांगितले जाते, मात्र काही गुन्हेगारांनी पापक्षालनासाठी गंगेऐवजी सत्तेची वाट निवडली. 90 च्या दशकात उल्हासनगरमधील कलाणी आणि वसई-विरारमधील ठाकूर यांनीही सक्रीय राजकारणाची वाट निवडली. अशा काही लोकांनी दाखवून दिले की, TADA चा आरोपी असणे ही राजकारणात प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करणारे ठरू शकते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक अंडरवर्ल्ड डॉनना राजकारणात उतरण्याची खुमखुमी चढायला लागली होती. यापैकीच एक होता अरुण गवळी. एकेकाळी मुंबईत पाच मोठ्या गँग होत्या, त्यापैकी एका गँगचा गवळी हा म्होरक्या होता. खंडणी, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर होते.
90 च्या दशकात जेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डविरुद्ध आघाडी उघडली होती. मुंबईतून गँगवॉर संपवायचंच हा निर्धार मुंबई पोलिसांनी केला होता. एकामागोमाग एक गँगस्टर चकमकीत मारले जाऊ लागले. हे पाहून धास्तावलेल्या अरुण गवळीला जाणवले की राजकारणाचा वापर आपण जीव वाचवण्यासाठी करू शकतो. त्याने यासाठी स्वतःची 'अखिल भारतीय सेना' नावाची पार्टी स्थापन केली आणि 2004 मध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावले. त्या निवडणुकीत गवळीच्या पदरी निराशा पडली, मात्र त्याने 93,000 मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला होता. गवळीचा आत्मविश्वास यामुळे वाढला होता, त्याने त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्याला यश मिळालं आणि पोलीस स्टेशनमध्ये कोंबडा करून बसवण्यात येणारा अरुण गवळी आमदार झाला.
दगडी चाळ ते विधानभवन
क्राईम रिपोर्टर म्हणून, मी अनेकदा दगडी चाळीत गवळीला भेटायला जायचो. निवडणूक जिंकल्यानंतर काही दिवसांनी, एके सकाळी त्याचा फोन आला. त्याने म्हटले की, "मी पहिल्यांदाच विधान भवनात जात आहे... शपथ घेण्यासाठी." ही माझ्यासाठी एक खास बातमी होती, कारण त्याने इतर कोणत्याही पत्रकाराला याबाबत सांगितले नव्हते. मी तत्काळ माझ्या कॅमेरामॅनसोबत दगडी चाळीत पोहोचलो.
नक्की वाचा: मामाची हत्या, भाच्याच्या खूनाने बदला! धडाधड 9 गोळ्या अन् घोषणा.. आयुष कोमकरला कसं संपवलं?
गवळीने विधीमंडळात जाण्यासाठीची तयारी केली होती. त्याचा ताफा इतरांप्रमाणे नव्हता. त्याचा ताफा फिल्मी स्टाईल होता. अरुण गवळी मिनी बसमधून प्रवास करायचा, या बससोबत वीस तरुण गवळीच्या 'प्रोटेक्शन' साठी नेहमी तैनात असायचे. हे सर्व गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेले तरुण होते. गवळीच्या सुरक्षेसाठी उभे राहणारे हे तरुण अरुण गवळीला "डॅडी" आणि त्याची पत्नी आशाला "मम्मी" म्हणून बोलावतात. गवळीने काळ्या पैशातून या सगळ्या तरुणांच्या उदरनिर्वाहाची सोय लावून दिली होती.
पोलिसांची होती ताफ्यावर नजर
सकाळी दहा वाजता, गवळीची मिनी बस विधानभवनाच्या दिशेने निघाली. बसच्या चारही बाजूने सुमारे 20 मोटार सायकल होत्या. या मोटारसायकलवर गवळीला 'प्रोटेक्शन' देणारे तरुण होते. हा ताफा दगडी चाळीतून विधान भवनाच्या दिशेने निघाला. वाटेत गवळीने मला मुलाखत दिली ज्यात त्याने आमदार बनण्यामागची कारणे सांगितली, जनतेच्या भल्याचे आश्वासन दिले, पण आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोलणे मात्र टाळले.
मला हे सतत जाणवत होते की, मी मोठी जोखीम उचलली आहे, कारण मी ज्या बसमधून गवळीसोबत जात होतो, तिला गवळीच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून लक्ष्य करण्यात येण्याची दाट शक्यता होती. गवळीची नजरही स्थिर नव्हती. तो सतत खिडकीतून बाहेर बघत होता. कदाचित त्यालाही हीच भीती सतावत असावी. अचानक, माझी नजर बससोबत जाणाऱ्या काही लोकांवर पडली. त्यांना पाहताच मला कळाले की ते साध्या वेशातील क्राईम ब्रांचचे अधिकारी होते. हे अधिकारी गवळीवर बारीक नजर ठेवून होते, कारण गवळी जरी आमदार झाला असला तरी त्यांच्यासाठी तो अजूनही गुन्हेगारच होता.
मिनी बस सोडली आणि मर्सिडीज गाठली
विधान भवनापासून काही मीटर अंतरावर असलेल्या शिव सागर रेस्टॉरंटजवळ गवळीची मिनी बस अचानक थांबली. बससमोर एक काळ्या रंगाची मर्सिडीज आधीच उभी होती. गवळी बसमधून उतरला आणि मर्सिडीजमध्ये बसला. हे गवळीने जाणीवपूर्वक केले असावे असे मला वाटत होते. या कृत्यातून गवळीने एक संदेश देण्याचा प्रयत्न केला असावा की, सत्तेच्या खेळाचा तोही एक खेळाडू बनला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world