
शुभम बायस्कार
प्रहार पक्षाचे प्रमुख अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांचा भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत पराभव केला. त्यानंतर कडूंच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. आधीच त्यांची आमदारकी गेली आहे. त्यात आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशा स्थितीत बच्चू कडू यांच्या पुढील पर्याय काय याची ही चर्चा अमरावती जिल्ह्यात सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांची सर्वाधिक काळ सत्ता राहीली. त्यांना सहकार नेते म्हणून ओळखले जाते. ते काँग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष ही आहेत. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन झालं. शिंदेसोबत बच्चू कडूही गेले. त्यानंतर वीस वर्षापासून सहकारात दबदबा राहिलेल्या बबलू देशमुख यांच्या सहकारातील सत्तेला कडूनी सुरुंग लावला. त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेतली. बच्चू कडू यांच्या गटातील आठ संचालक हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झाले. तर बबलू देशमुख यांच्या गटाचे तेरा संचालक निवडून आले.
जिल्हा बँकेत 21 संचालक मंडळाची बॉडी आहे. यातील बबलू देशमुख गटातील तीन संचालक फोडत, बच्चू कडू यांनी 11 संचालकांच्या जोरावर बबलू देशमुख यांना जिल्हा बँकेतील सत्तेपासून रोखले होते. तेव्हापासूनच जिल्हा बँकेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष हा तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील विरोधकांनी विविध कारण पुढे करत बच्चू कडूंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती येथील विभागीय निबंधक सहकारी संस्था यांनी विरोधकांच्या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना चांगलं खडसावलं आहे.
काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे निकटवर्ती असलेले जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे विरोधात ही तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत विभागीय निबंधक सहकारी संस्था प्रवीण फडनीस यांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली आहे. यात थेट बच्चू कडू संचालक पदासाठी अपात्र ठरत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला संचालक पदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमा प्रमाणे संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंत शिक्षा सुनावली असेल तर अशा संचालकांना बँकेच्या पदावर राहता येत नाही. याच नियमाचा दाखला देत विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडूना संचालक पदावरून अपात्र करण्याची मागणी केली आहे. कारण, बच्चू कडू यांच्यावर 2017 मध्ये नाशिक मधील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा व मारहाण करण्यात संदर्भातील गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात त्यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षापर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा 2021 मध्ये सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world