मागील 3-4 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात तब्बल 1 हजार 545 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मागील तीन दिवसात मराठवाड्यातील तब्बल 1 हजार 85 टँकर बंद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली. विहिरी आणि बोरवेलचे पाणी आटले होते. अनेक धरणे कोरडेठाक पडले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला होता. अशात प्रशासनाकडून गाव तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जून महिन्यात देखील मराठवाड्यात 1 हजार 545 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अशात गेल्या चार-पाच दिवसांत मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला असून विहिरी देखील भरल्या आहे. या भागातील पाणी प्रश्न सुटल्याने प्रशासनाने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जालना जिल्ह्यात 463 टँकरने पाणीपुरवठा सुरच
प्रशासनाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आता बंद करण्यात आले आहे. मात्र, एकमेव जालना जिल्ह्यात पाण्याचे टँकर अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात आज घडीला 463 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा
गेल्या तीन-चार दिवसात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील 1000 पेक्षा अधिक टँकर बंद करण्यात आले आहे. पण असे असले तरीही मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 4.45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गेल्यावर्षी आजच्या दिवशी याच जायकवाडी धरणात 26.50 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यास जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world