Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना भारतीय जनता पक्षावर (भाजप) आयाराम–गयाराम आणि घराणेशाही जपण्याचे आरोप होत आहेत. एकेकाळी घराणेशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने नाईक कुटुंबाला पुन्हा पक्षात स्थान दिल्याने पक्षांतर्गत तसेच राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
नाईक कुटुंबाला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर आमदार संदीप नाईक यांना नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. पुढे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील तिकीट नाकारल्यानंतर संदीप नाईक यांनी आपल्या पक्षातील आमदारावर सार्वजनिक टीका केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधून निवडणूक लढवली होती. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आल्याने भाजपची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप केला जात आहे.
नवी मुंबईतील महायुतीमध्येही तणाव...
राजकीय विश्लेषकांच्या मते एकीकडे भाजप आयाराम–गयाराम राजकारणावर टीका करत असताना दुसरीकडे वारंवार पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याने तळागाळातील जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. “घराणेशाहीविरोधातील भाजपची भूमिका केवळ भाषणापुरतीच मर्यादित राहिली आहे,” अशी टीका विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, नवी मुंबईतील महायुतीमध्येही तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. “संदीप नाईक हटवा, महायुती टिकवा” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, युती १०० टक्के तुटण्याची शक्यता काही नेते व्यक्त करत आहेत.
एकेकाळी “मिस्टर १० टक्के” असे आरोप ज्या नाईक कुटुंबावर झाले होते, त्याच कुटुंबाला भाजपकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक जुने, निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला नवी मुंबईत तीव्र विरोधाला सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेतृत्व या आरोपांवर काय भूमिका घेते आणि कार्यकर्त्यांचा असंतोष कसा शांत करते, याकडे संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
