12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांचे निकाल 9 फेब्रुवारी रोजी लागले. विधानसभा निवडणुका, नगरपरिषद निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर झालेल्या या निवडणुकांमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. मराठवाड्यातही भाजपला चांगले यश मिळाले असून मराठवाड्यातील एकूण 4 जिल्हा परिषदांपैकी परभणीमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक राहिला आहे. म्हणजे लढवलेल्या एकूण जागांपैकी निवडून आलेल्या सर्वाधिक जागा या परभणीत आहेत. बाजपने परभणीत जिल्हा परिषदेच्या एकूण 54 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यातील 24 जागांवर भाजपला यश मिळालं आहे.
नक्की वाचा: भाजप पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष! मुख्यमंत्र्यांची एकही सभा नाही, पक्षाने कसा मिळवला विजय?
मेघना बोर्डीकर यांचे नियोजन अचूक ठरले
परभणी जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय हे या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिले जात आहे. एकेकाळी परभणी जिल्ह्यात भाजपचा एकही नगराध्यक्ष नव्हता, आज दोन नगराध्यक्ष कार्यरत आहेत. नगर परिषद सदस्यांची संख्या 4 वरून थेट 42 वर पोहोचली असून, महानगरपालिकेतही 8 वरून 12 सदस्य झाले आहेत. जिल्हा परिषदेत 5 वरून 24 सदस्यांपर्यंत मजल मारली असून पंचायत समिती सदस्यांची संख्या आता 44 झाली आहे अशी माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे.
नक्की वाचा: शरद पवारांच्या जवळची, सुप्रिया सुळेंची खास; सक्षणा सलगरला किती मतं पडली?
परभणीत भाजपची ताकद वाढली
मेघना बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यासोबतच जिल्ह्यात प्रलंबित विकासकामांना गती दिली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे आगामी काळात परभणी जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागेल असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वर्तवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world