
मनोज सातवी, पालघर: 'लाडकी बहीण योजना बंद पडावी काही लोक प्रयत्न करत होते. म्हणून सावत्र भावांवर, दृष्ट भावांवर लक्ष ठेवा. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही योजना खोटी आहे, जुमला आहे म्हणत बदनाम केले. सावत्र भावांनी लाडक्या बहिणींचा अपमान केला. कोर्टातही गेले, पण मी सांगतो कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
'पालघर म्हणजे ठाण्याचा भाऊ, नुसता भाऊ नाही लाडका भाऊ. जिल्हा विभाजन झाले असले तरी पालघर आणि ठाणे आनंद दिघेंनी पिंजून काढलेले जिल्हे आहेत. इथ शिवसेना रुजवण्यासाठी आनंद दिघे यांनी परिश्रम घेतले. बाळासाहेबांचे विचार खेडोपाड्यात पोहोचवण्याचे काम आनंद दिघेंनी केले. दिघे साहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात भिनले. मी सुद्धा दिघे साहेबांना डोळ्यासमोर ठेऊन काम करतो. त्यांच्याच विचाराने नगरसेवक ते मुख्यमंत्री झालो, असे म्हणत आपण आनंद दिघे, बाळासाहेबांचा चेला आहे..' असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
नक्की वाचा: ...म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळेंनी राममंदिर दर्शन घेतलं नाही', अमित शहा कडाडले
'मी श्रीनिवास वनगा यांचे अभिनंदन करतो. त्यांनी उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, दु:ख होणार, वाईट वाटणार. पण मी श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी दिलेला शब्द पाळतो. आम्ही उठाव केल्यानंतर श्रीनिवास आमच्यासोबत होता.त्याने एकही प्रश्न केला नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, श्रीनिवासंच कल्याण होईल, चांगल होईल. लोक आता या सरकारलाही आपले सरकार, लाडके सरकार म्हणून लागलेत. हीच पोहोचपावती आहे.
'ही लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांवर, दृष्ट भावांवर लक्ष ठेवा. ही योजना खोटी आहे, जुमला आहे म्हणत बदनाम केले. सावत्र भावांनी लाडक्या बहिणींचा अपमान केला. कोर्टातही गेले, पण मी सांगतो कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मविआवाले म्हणतात, 'सरकार आल्यावर लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका शेतकरी सर्वांची चौकशी करु. पण हा एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही.लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे एकदा नाही १०० वेळा जेलमध्ये जाईल. काँग्रेसने, राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये अशाच घोषणा केल्या पण सरकार आल्यावर केंद्राकडे पैसे मागायला लागले. त्यांचे नेते म्हणतात खटखटाखट देंगे पण कधी? आम्ही पटपटापट लाडक्या बहिणींना पैसे दिले,' असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world