
Eknath Shinde On Maharashtra Rain : मागील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. नद्यांना पूर आल्याने जवळपासच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून बळीराजाही संकटात सापडला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर,रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आपात्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची मनुष्य आणि पशुहानी होऊ नये,यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी,ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव,रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे,पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड,ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि मुंबई,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
नक्की वाचा >> Maharashtra Rain : मोठ्या धरणाचे दरवाजे उघडले..अनेक गावांचा संपर्क तुटला! महापूराचा Video पाहून धडकीच भरेल
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर,भिवंडी, मीरा भाईंदर,वसई -विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाचा आढावा घेण्यात आला. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी, ती धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. पण रात्रीपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी,असे आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.
शिंदे पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,अशी ठिकाणी राहणाऱ्या लोकांना वेळेआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. लोकांसाठी पालिकांच्या शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये जेवण आणि पाण्याची सोय करावी.सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून मोबाईल फोन चोवीस तास चालू ठेवावे.कोणीही फोन केल्यास, त्या व्यक्तीच्या फोनला उत्तर द्यावे. वीजमहामंडळ लोकांचे फोन घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.आपत्कालीन सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ऑन फील्ड सज्ज राहावे.
नक्की वाचा >> Viral Video'लाज वाटत नाही का..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा
धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्या
ठाणे, भिवंडी,उल्हासनगर मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावे. एखादी इमारत खचल्याची घटना निदर्शनास आल्यास ती इमारत तात्काळ रिकामी करावी. धरणांच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावे, असेही निर्देश शिंदे यांनी दिले. मुंबई,ठाणे,भिवंडी आणि महामार्गावर वाहतूक कोंडीचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, असाही आदेश शिंदे यांनी दिला आहे.
रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ते गाव तातडीने रिकामे करून लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे. मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली, तरीही पावसाचा जोर वाढला किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तर, त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.
मराठवाड्यातील परिस्थितीचाही घेतला आढावा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अहिल्यानगर येथे पावसाचा जोर कायम असून तिथेही पूर आला आहे.आज सकाळी आपण तेथील जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच नदी जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले.तसेच त्यांच्या जेवणाची आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रसंगी काही अटी शर्ती बाजूला ठेवून त्यांना मदत करावी लागेल. राज्य शासनाकडून ही मदत लवकरच त्यांना देण्यात येईल, ही वेळ शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आहे आणि ते काम आम्ही नक्की करू, असेही शिंदे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world