आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराड प्रकरण आणि बीड पोलीस स्टेशनबाहेरील पाच खाटांवरुन सुरू असलेल्या वादातून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणात दबाव येऊ नये म्हणून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना मुंडेंनी आपली भूमिका मांडली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी व्यवस्थितपणे तपास करीत आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि दोषीला फासावर लटकवणं माझ्यासाठी आवश्यक असल्याचं मुंडे म्हणाले. या प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये जायला हवं याची मागणी सर्वात आधी मी नागपूरच्या अधिवेशनात केली होती, असंही ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मी राजीनामा का द्यावा, कारण काय? मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही. कोणत्याही घटनेशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही. हा तपास सीआयडीकडे दिला आहे. न्यायालयातही तपास होणार आहे. त्यामुळे मी मंत्री म्हणून या प्रकरणावर कुठलाही दबाव होऊ शकत नाही, असंही धनंजय मुंडे यांनी सांगत या राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
नक्की वाचा - Walmik Karad News : बीड पोलीस स्टेशनबाहेरील ते 5 पलंग कोणासाठी?
त्या पाच खाटांचं काय?
वाल्मिक कराड बीड पोलीस स्टेशनमध्ये आहे. दरम्यान बीड पोलीस स्टेशनसाठी पाच खाटा मागविण्यात आल्या आहे. या खाटा वाल्मिक कराडसाठी मागविण्यात आल्याचा आरोप विजय वड्डेटीवार आणि रोहित पवारांनी केला आहे. मात्र या खाटा पूर्वीच मागवल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. घटनेशी त्याचा संबंध नसल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world