जाहिरात

Dhule News : शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधी रुपये; अनिल गोटेंचा गंभीर आरोप

अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता.

Dhule News :  शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधी रुपये; अनिल गोटेंचा गंभीर आरोप

नागिंद मोरे, धुळे

धुळे जिल्ह्यातील विश्रामगृहात 1.84 कोटी रुपये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे नेमके कुणाचे आहेत याचा शोध घेतला जात आहे. मात्र आमदार अर्जुन खोतकर याच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने ही रुम बूक असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी यावरून गंभीर आरोप केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेल्या अंदाज समितीद्वारे धुळे जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झालं होतं. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती. 

अंदाज समितीचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृह येथे दुपारपासूनच पहारा दिला  होता. 

( नक्की वाचा :  Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या )

दरम्यान यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांसह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला. मात्र, एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं.  स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता.

दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील रूम आरक्षित करण्यात आला होता. याच ठिकाणी कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. त्यानंतर रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्रामगृहाचे 102 नंबर रूमचे कुलूप तोडून, अखेर तपासणी केल्यानंतर त्या रूम मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड सापडली.

( नक्की वाचा : Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन )

जवळपास 3 मशीन द्वारे रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते. रात्रभर शासकीय विश्रामगृहाबाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अखेर इतके पैसे नेमके कुठून आले आणि कुणी दिले याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत.

धुळ्यात आलेल्या समितीमधील 11 आमदार यांची नावे

समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर, समिती सदस्य आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com