मध्यप्रदेश सरकारने लागू केलेल्या 'लाडली बहन' (Ladli Behan scheme) योजनेचा येथील नागरिकांकडून मोठं कौतुक करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान या योजनेमुळे मोठा फायदा झाल्याचंही म्हटलं जात होतं. दरम्यान त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट दिली आहे. रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली जात आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'अंतर्गत (Chief Minister ladki bahin Yojana) मध्यप्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये मिळणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महिलांची मते आणि मनं जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना अनोखी भेट देण्यात येत आहे. त्यामुळे 90-95 लाख महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये मिळतील. राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 15 ते 20 कोटींचा अधिभार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नक्की वाचा - पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, मृतांच्या पालकांना CM शिंदेंनी दिले हे आश्वासन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने कंबर कसली आहे. येत्या तीन ते चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून नवनव्या योजना आणल्या जात आहेत. महिला आणि तरूणांसाठी मतपेढीवर महायुती अधिक लक्ष देऊन आहे. मध्य प्रदेशात राबवली जाणारी लाडली बहन योजनेची माहिती घेण्यासाठी शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशात पाठविले होते. त्यांनी या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आता महाराष्ट्रात ही योजना राबवली जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world