जाहिरात

Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? दिल्लीत घडलेल्या घडामोडींची Inside स्टोरी

Why did Eknath Shinde visit Delhi? : संजय शिरसाट, संदिपान भुमरे , संजय गायकवाड , तानाजी सावंत, प्रताप सरनाईक यांसारखे शिंदे गटाचे नेते विविध प्रकरणांमध्ये वादात सापडताना दिसत आहेत.

Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? दिल्लीत घडलेल्या घडामोडींची Inside स्टोरी
मुंबई:

रामराजे शिंदे, सागर कुलकर्णी

राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली (Delhi) दौऱ्याची. विधानसभेचे (Vidhan Sabha) अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या मोठ्या नेत्यांशी भेट न झाल्याची माहिती मिळते आहे. असे असले तरी, या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा: "दिल्लीत गुरु अमित शाहांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतले", संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत )

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचे कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी रात्रीतच दिल्ली गाठली होती, त्यांच्या या अचानक दौऱ्यामागे अनेक कारणे दिली जात आहेत:

  1. आमदारांच्या अडचणी: शिंदे गटाचे आमदार नवनवीन प्रकरणांमध्ये अडकत आहेत. आमदारांना मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याची भावना त्यांच्यात आहे.
  2. निधीचा मुद्दा: शिंदे गटाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. वित्त मंत्रालय (Finance Ministry) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असल्याने निधीवरून महायुतीत (Mahayuti) खडाजंगी सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा दौरा केल्याचे बोलले जात आहे.
  3. राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याने शिंदे गटात चलबिचल वाढली आहे. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी दिल्ली गाठल्याचे म्हटले जात आहे.

( नक्की वाचा: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता )

शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांची दिल्लीवारी ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानेच झाल्याचा आरोप केला आहे. 

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शिंदेंवर टीका करताना म्हटले आहे की, "महायुतीतील पक्षांमध्ये आपापसात ताळमेळ नाही, त्यांच्यात गँग वॉर सुरू आहे. कदाचित गँगवॉरची कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असावेत." शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली तर त्यात गैर काय आहे ? शिवसेना एनडीएचा भाग असल्यामुळे ते दिल्लीत जाऊन भेटीगाठी घेत असतात असे सामंत यांचे म्हणणे आहे. शिंदे यांची दिल्लीवारी ही आमदारांना दिल्या जात असलेल्या त्रासाबद्दल अथवा ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून नसल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे. मग एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला का गेले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

शिवसेना आमदारांच्या अडचणी वाढत चालल्या 

संजय शिरसाट, संदिपान भुमरे , संजय गायकवाड , तानाजी सावंत, प्रताप सरनाईक यांसारखे शिंदे गटाचे नेते विविध प्रकरणांमध्ये वादात सापडताना दिसत आहेत. यामुळे शिंदे यांची प्रतिमा मलीन होत असून त्यांचे महायुतीतील स्थानही कमजोर होऊ लागल्याच्या चर्चा ऐकू येतात. एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या अडचणी वाढत असताना, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. त्यातच अजित पवारांकडून मिळणारा अपुरा निधी यामुळे शिंदेंना आतून बाहेरून संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीकडे डोळे लावून एकनाथ शिंदे बैठकीसाठी वाट पाहत होते. परंतु या दौऱ्यात भाजपच्या (BJP) कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली नसल्याचे कळते आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com