
राहुल कांबळे, प्रतिनिधी
बेलापूरच्या खाडीत एका महिलेची कार थेट कोसळल्याची थरारक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. गुगल मॅपच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवून कार चालवत असताना हा अपघात घडला. मात्र, नेमक्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलीस पथकाने धाव घेत महिलेला सुरक्षित वाचवले. या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा गुगल मॅपवर अवलंबून राहण्याचे धोके अधोरेखित झाले आहेत.
गुगल मॅपचा फसवणूक रस्ता
शुक्रवारी पहाटे सुमारे 1 वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या कारने उलवेच्या दिशेने निघाली होती. बेलापूर परिसरातील खाडीपुलावरून मार्गक्रमण करण्याऐवजी गुगल मॅपच्या सूचनेनुसार तिने पुलाखालचा रस्ता निवडला. गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले. मात्र, प्रत्यक्षात तो रस्ता जेट्टीवर जाऊन संपतो, हे लक्षात न आल्याने कार थेट ध्रुवतारा जेट्टीवरून खाडीत कोसळली.
सागरी पोलिसांची वेळीच मदत
हा अपघात घडताच खाडीकाठी स्थित सागरी सुरक्षा पोलिस चौकीतील जवानांनी प्रसंगावधान राखत त्वरित घटनास्थळी धाव घेतली. गस्ती व रेस्क्यू बोटीद्वारे त्यांनी वाहून जात असलेल्या महिलेचा शोध घेऊन तिला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने खाडीत कोसळलेली कार बाहेर काढण्यात आली.
नक्की वाचा - Navi Mumbai : खारघर पांडवकडा धबधब्यावर जीवघेणा थरार, अग्निशमन दलानं वाचवले तरुणाचे प्राण
महिलेचे वक्तव्य आणि पोलिसांची सतर्कता
अपघातातून बचावलेली महिला फारच घाबरलेली होती. तिने पोलिसांना सांगितले की, गुगल मॅपमध्ये दाखवलेला रस्ता सरळ असल्याचे तिला वाटले. मात्र प्रत्यक्षात तो रस्ता जेट्टीवर जाऊन थांबतो, हे कळण्याआधीच गाडी खाडीत कोसळली. सुदैवाने, सागरी पोलिस चौकी अगदी अपघातस्थळाच्या समोर असल्याने तिला तत्काळ मदत मिळाली. अन्यथा रात्र असल्यामुळे कोणी वेळेवर पोहचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
गेल्या काही वर्षांत देशभरात गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे अशा प्रकारचे अपघात सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी गुगल मॅपवर अवलंबून राहताना अतिरिक्त सतर्कता बाळगण्याची गरज आहे. स्थानिक माहितीची खातरजमा करूनच प्रवास करावा.
नवी मुंबई पोलिस पथकाचे कौतुक
महिलेचे प्राण वाचविणाऱ्या सागरी सुरक्षा विभागाच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगात दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे एक अनर्थ टळला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world