
मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात रंगलेले गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यातील राजकारण हे अजूनही धगधगत आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढणारे गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे आता महायुतीत एकत्र येणार आहेत. शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीत दोन्हीही गुलाबराव हे एकत्र येणार असले, तरी दोघांमधील राजकीय वैमनस्य पाहता महायुतीसाठी दोन्हीही गुलाबराव डोकेदुखी ठरणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गज उमेदवारांनाचाही पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत रंगली होती.
गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील राजकीय वैमानस्य हे सर्वश्रुत आहे. 2009 मधील विधानसभा निवडणूक वगळता गुलाबराव पाटलांनी देवकरांचा 4 ते 5 वेळा पराभव केला. मात्र या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर गुलाबराव देवकरांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत शरद पवारांना धक्का दिला. गुलाबराव देवकरांच्या या निर्णयाला मात्र गुलाबराव पाटलांनी तीव्र विरोध केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबराव देवकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश हा प्रलंबित होता. मात्र आता अजित पवारांकडून गुलाबराव देवकऱ्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाला असून 3 मे रोजी गुलाबराव देवकर हे अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
(नक्की वाचा- Pehalgam Terror Attack: 'PM मोदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर, जाता जाता पाकचे 4 तुकडे...' 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!)
गुलाबराव पाटलांची टीका
गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्याचा अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय गुलाबराव पाटलांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. गुलाबराव देवकरांनी जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला असला तरी मात्र त्यांचे घोटाळे हे लपणार नसून ते घोटाळे लपवण्यासाठीच अजित पवारांसोबत जात असल्याचा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे. तर एकीकडे माणसं तपासून पक्षात घेत असल्याचे अजित पवार छाती ठोकपणे म्हणत असले तरी देवकरांसारखी चांगली माणसं त्यांनी तपासली असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांनाही लगावला आहे.
गुलाबराव देवकरांचा पलटवार
गुलाबराव पाटलांच्या विरोधात आपण निवडणूक लढवल्याने त्यांचा आपल्याला विरोध आहे. मात्र दुसऱ्या पक्षातील नेत्याने सांगितलं म्हणून मला दुसऱ्या पक्षाचे नेते पक्षात घेणार नाही, असं होत नाही असं म्हणत देवकरांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. आपण किरकोळ कार्यकर्ता नसून आपलंही चांगलं वजन आहे त्यामुळे पक्षांना माझी गरज असल्याचे गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
ठाकरे गटाची देवकरांवर टीका
गुलाबराव पाटलांविरोधात शिवसेना ठाकरे गटाला आपला उमेदवार द्यायचा होता. त्यासाठी गुलाबराव देवकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून ही निवडणूक लढवण्याची विनंती ठाकरे गटाच्या नेत्यांनी देवकरांना केली होती. मात्र अनेक वर्षांपासून आपण शरद पवारांसोबत असून त्यांची साथ सोडणार नसल्याचे पवित्रा गुलाबराव देवकरांनी विधानसभा निवडणुकीत घेतला होता. त्यावेळी गुलाबराव पाटलांना पराभूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने गुलाबराव देवकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांचा प्रचार केला. पण पराभवानंतर आता देवकरांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाची शिवसेना ठाकरे गटारी देखील खिल्ली उडवली. आता महायुतीत दोन्हीही गुलाबराव एका व्यासपीठावर येऊन एकमेकांविरुद्ध कसे गौरवोद्गार काढणार ही गंमत आता आम्ही पाहणार असल्याचे देवकरांचे कट्टर समर्थक व ठाकरे गटाचे पदाधिकारी माणिक पाटील यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world