जाहिरात

Amravati News: चादरेची झोळी अन् खाटेचा आधार; मातेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खडतर प्रवास

Amravati News: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन उपचारासाठी तयार केले. मात्र, रस्त्याअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मातेला रुग्णालयापर्यंत नेण्याची तयारी दाखवली.

Amravati News: चादरेची झोळी अन् खाटेचा आधार; मातेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खडतर प्रवास

शुभम बायस्कार, अमरावती

Amravati News: स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही महाराष्ट्रातील मेळघाटसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये रस्त्यांची दुरावस्ता कायम आहे. आदिवासी बांधवांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशीचे एक घटना अमरावतीच्या धारणी तालुक्यात घडली आहे. येथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आणि कर्तव्यामुळे एका गरोदर मातेचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचला आहे.

सरिता भिलावेकर नावाच्या मातेला उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिनची कमतरता आणि सिकलसेल कॅरिअरचा त्रास जाणवत होता. तिची ही दुसरी प्रसूतीची वेळ असल्याने तिला तातडीने धारणी येथील रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. आरोग्य विभागाने संपर्क साधल्यावर, आजारी असूनही सरिता भिलावेकर यांनी रुग्णालयात जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्या जंगलात जाऊन बसल्या होत्या.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन उपचारासाठी तयार केले. मात्र, रस्त्याअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मातेला रुग्णालयापर्यंत नेण्याची तयारी दाखवली.

(नक्की वाचा-  Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप)

चादरची झोळी करून प्रवास

आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम चादरची तात्पुरती झोळी केली आणि मातेला त्यातून वाहून नेण्यास सुरुवात केली. पुढे जंगल, शेत, नाले असा खडतर प्रवास पार केला. मातेला रुग्णवाहिका उभी असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत सुखरूप आणले.

मातेची आणि बाळाची प्रकृती स्थिर

वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सध्या मातेची आणि तिच्या बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संजिता महापात्र यांनी दिली आहे. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा मेळघाटातील आदिवासींच्या आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com