जाहिरात

Jalna Accident: ट्रक-बाईकच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू; 11 वर्षीय मुलगाही गंभीर जखमी

Jalna Accident News: जालना-देऊळगाव राजा रोडवर टिपर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत कुंभारझरी येथील विनोद चव्हाण आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Jalna Accident: ट्रक-बाईकच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू; 11 वर्षीय मुलगाही गंभीर जखमी

लक्ष्मण सोळुंके, जालना

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. भरधाव टिपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. जालना-देऊळगाव राजा रोडवरील खामखेडा पाटीजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जाफ्राबाद तालुक्यातील पूर्णा नदीजवळ असलेल्या खामखेडा पाटी येथे हा अपघात घडला. कुंभारझरी येथील रहिवासी विनोद उत्तम चव्हाण (वय 34 वर्ष) आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा युवराज चव्हाण यांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.  विनोद यांचा मोठा मुलगा शौर्य चव्हाण (वय 11 वर्ष) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

(नक्की वाचा- पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)

कुंभारझरी गावावर शोककळा

अपघाताची माहिती मिळताच कुंभारझरी गावासह जाफ्राबाद तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात अत्यंत दुःखी वातावरण आहे. गंभीर जखमी असलेल्या शौर्यला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

(नक्की वाचा-  T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)

दुचाकीचा चक्काचूर

अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघातानंतर टिपर चालकावर काय कारवाई झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com