जाहिरात

Accident News: शनिवार ठरला अप'घात'वार! राज्यात 5 भयंकर दुर्घटना; 15 हून अधिक जणांचा मृत्यू

आज (शनिवार, ता. 22 ) राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांमध्ये 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Accident News: शनिवार ठरला अप'घात'वार! राज्यात 5 भयंकर दुर्घटना; 15 हून अधिक जणांचा मृत्यू

Maharashtra Accidents News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांचे सत्र सुरु आहे. अशातच आज (शनिवार, ता. 22 ) राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांमध्ये 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालन्यात घडलेल्या पाच कामगारांच्या मृत्यूसह भीषण अपघात, बुडून मृत्यूच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालन्यात पाच जणांचा मृत्यू!

जालन्यामध्ये मजुरांच्या शेडवर वाळू टाकल्याने अंगावर शेड कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. टिप्पर चालकाने पत्र्याच्या शेडवर वाळू आणून टाकल्याने शेड कोसळले आणि झोपेतच या सर्वांचा करुण अंत झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवरा बायकोसह मुलाचा मृत्यू

रत्नागिरी- नागपूर मार्गावरील भोसे जवळ चारचाकीने दुचाकीला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पती पत्नीसह एक वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. दुचाकीवरील कुटुंब हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील  ऊसतोड कामगार होते. ऊसतोड संपल्याने ते दुचाकीवरुन आपल्या गावी परतत असताना ही भयंकर घटना घडली.

ट्रेंडिंग बातमी - Sharad pawar in ABMSS: राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं

भलामोठा ट्रक रिक्षावर उलटला..

मुंबई आग्रा महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मालेगावच्या दरेगाव शिवारात भलामोठा ट्रक रिक्षावर उलटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये रिक्षामधील तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मालवाहू ट्रॅक महामार्गावरून विरुद्ध बाजूने जात असताना हा भयंकर अपघात घडला. 

पुण्यात तरुणाचा, शिरपूरमध्ये महिलेचा मृत्यू

शुक्रवारी, सायंकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील गिधाडे बाळदे रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील मालुबाई कांतीलाल शिरसाट या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रॅक्टर जाळून आपला रोष व्यक्त केला.  पुण्यामध्येही एक भीषण अपघाताची बातमी समोर आली असून पुण्यातील महंमदवाडीमध्ये घडलेल्या या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास तानशेत ते खर्डी दरम्यान एक अज्ञात मुलगी लोकल ट्रेन मधून पडली असून तिचा काहीही एक ओळख पटली नाही. रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणला असून नातेवाईकांचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु आहे.

बुडून तिघांचा मृत्यू

मालवमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले, त्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला समुद्रामध्ये पाचही जण बुडाले मात्र यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले असून दोघांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, आई-वडील मिरच्या तोडण्यासाठी तेलंगणात गेले असताना आपल्या आजीसोबत मार्कंडादेव येथे आलेल्या 12 वर्षीय बालकाचा वैनगंगा नदीत दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड येथे ही दुर्घटना घडली.