प्रांजल कुलकर्णी,
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता प्रचार सभा, बैठका, आरोप- प्रत्यारोपांना जोर आला आहे. एकीकडे विधानसभेचा प्रचार रंगात आला असतानाच महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाशिकमधील नांदगाव मतदार संघामध्ये समीर भुजबळ यांच्या उमेदवारीविरोधात शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातही अजित पवार गट युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
महायुतीत नाराजीनाट्य!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभेचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. देवळाली विधानसभा मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सरोज आहेर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. राजश्री आहेरराव या मैदानात उतरल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीविरोधात नाराजी व्यक्त केली असून अजित पवार गट महायुती धर्म पाळत नसल्याचा आरोप केला आहे. देवळाली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भुजबळ कुटुंबाबाबत नाराजीचा सूर उमटला असून भुजबळ कुटुंबावर एवढे प्रेम का? असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित केला आहे.
भुजबळांवर एवढं प्रेम का? शिंदे गटाचा सवाल
महायुतीत नांदगाव विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे, मात्र याठिकाणी छगन भुजबळ यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे छगन भुजबळ स्वतः आमदार, मुलगा पंकज भुजबळ राज्यपाल नियुक्त आमदार असतांना नांदगावमध्ये सुहास कांदेविरोधात समीर भुजबळला अपक्ष उभे केल्याने शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानुसार देवळली मतदारसंघात शिवसेना काम करेल असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे महायुतीमध्येच नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
बंडखोर स्नेहा पाटील यांच्यावर भाजपकडून कारवाई?
दुसरीकडे, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे यांच्या उमेदवारी समोर भाजपाच्या महिला मोर्चा पदाधिकारी स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे.विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याप्रसंगीच्या शक्ती प्रदर्शनात संपूर्ण भिवंडी तालुक्यातील भाजपा पक्ष पदाधिकारी सरपंच,पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य सहभागी झाले होते.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्नेहा पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर ही त्या आपल्या उमेदवारी वर ठाम राहिल्याने महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे. अशातच आता भाजप स्नेहा पाटील यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world