Eknath Shinde : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच शिवसेना शिंदे गटाच्याही निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाहीत? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
महायुती सरकारच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याची मुंबईमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. एकिकडे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज असलेले देवेंद्र फडणवीस हे देवदर्शन करताना दिसत आहेत. अशातच शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असतानाच महायुतीच्या सत्तास्थापनेआधी मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असून एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
नेमके काय घडले?
राज्यात महायुतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड झाली होती. दिल्लीमधील अमित शाहांच्या भेटीनंतर व्हायरल झालेला फोटो त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दाखवत होता. या भेटीनंतर त्यांनी थेट सातारा गाठला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा: 'एकनाथ शिंदे नाही तर आम्ही पण नाही' शपथविधी आधी महायुतीत टेन्शन वाढलं
महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाच्याही निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाहीत? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. आम्ही सर्वांनी तशी विनंती केली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे उदय सामंत म्हणाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंशिवाय कोणीही उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नाही. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद न घेतल्यास आम्हीही कोणी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, असे मोठे विधानही उदय सामंत यांनी केले आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या भेटीला जाणार असून त्यांना विनंती करणार असल्याचेही ते म्हणालेत.
एकनाथ शिंदे नाराज का?
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे सध्या गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. गृहमंत्रिपदावर ते वारंवार आपला दावा सांगत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे गृहमंत्रिपद ठेवणार असल्याने एकनाथ शिंदेंची कोंडी झाली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे वारंवार जाहीरपणे आपली नाराजी दर्शवत दबावाचे राजकारण करत असल्याची चर्चा आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देऊ नये, अशीही शिंदेंची मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार निधीवाटपामध्ये दुजाभाव करतात, त्यामुळे त्यांच्याकडे अर्थखाते देऊ नये, अशीही एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याची चर्चा आहे. अशात आता त्यांचीही नाराजी भाजप कशी दूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाची बातमी: भाजपची यशस्वी मध्यस्थी! आज एकनाथ शिंदेंचाही शपथविधी; 'ही' महत्वाची खाती मिळणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world