जाहिरात

Ajit Pawar :'आणि दादांनी कौतुकानं फोन केला,' विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी, हळवी पोस्ट Viral

IPS Vishwas Nangre Patil Facebook Post: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी सांगणारी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Ajit Pawar :'आणि दादांनी कौतुकानं फोन केला,' विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी, हळवी पोस्ट Viral
IPS Vishwas Nangre Patil : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अजित पवारांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
मुंबई:

IPS Vishwas Nangre Patil Facebook Post: महाराष्ट्र राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी  (28 जानेवारी 2026) घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी (29 जानेवारी 2026) बारामतीमध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवारांच्या अशा अचानक जाण्याने सर्वसामान्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली वाहत असताना, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विश्वास नांगरे पाटील हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अजित पवारांसोबत काम करताना आलेले अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )

शिस्त आणि कामाची विलक्षण पद्धत

विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या शिस्तीचे काही किस्से सांगितले आहेत. त्यांनी आठवण करून दिली की, जेव्हा ते पुणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते, तेव्हा अजित पवारांनी त्यांना स्पष्ट शब्दात जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

विशेष म्हणजे, अडीच वर्षांच्या या कार्यकाळात अजित पवारांनी कधीही कोणत्याही बदल्यांसाठी किंवा चुकीच्या कामासाठी दबाव टाकला नाही. उलट, जेव्हा नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली, तेव्हा पवारांनी स्वतः फोन करून त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्या बोलण्यातील अदब आणि आपुलकीचे वर्णन करताना पाटील म्हणतात की, ते आधी 'अहो नांगरे पाटील' आणि नंतर प्रेमाने 'अहो विश्वासराव' अशी साद घालायचे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजितदादांना अनोखी श्रद्धांजली! 'साडे माडे 3' च्या टीमचा काळजाला भिडणारा निर्णय )
 

बारामती पोलीस स्टेशन आणि टापटीपीची ओढ

अजित पवारांच्या बारकाईने लक्ष देण्याच्या स्वभावाबद्दल सांगताना पाटील यांनी बारामती पोलीस स्टेशनच्या बांधकामाची आठवण सांगितली. हे पोलीस स्टेशन बांधताना पवार स्वतः डझनभर वेळा साईटवर आले होते. बांधकामाचा दर्जा उत्तम असावा यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. जेव्हा हे पोलीस स्टेशन पूर्ण झाले, तेव्हा तिथले आलिशान लॉकअप पाहून त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती की, इतक्या छान लॉकअपमध्ये चोरांना ठेवले तर ते जामीनच मागणार नाहीत आणि आपल्याला त्यांना फुकट पोसावे लागेल.

संवेदनशील लोकनेता आणि मदतीचा हात

अजित पवार हे केवळ कडक शिस्तीचेच नव्हते, तर ते तितकेच संवेदनशीलही होते. भोर जवळील धरणात जेव्हा बोट उलटून 27 जणांचा मृत्यू झाला होता, तेव्हा त्यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता तातडीने स्वतःहून त्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत केली होती. नियमांच्या बाबतीत ते जितके कडक होते, तितकेच योग्य कामाचे समर्थन करणारेही होते. जेव्हा हायवेवरील डिव्हायडरच्या विषयावरून त्यांनी नांगरे पाटील यांना विचारणा केली होती, तेव्हा अपघातांची आकडेवारी पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि तसाच उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या होत्या.

( Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
 

पुण्यातील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईबद्दलही त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने नांगरे पाटील यांचा गौरव केला होता. मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा आणि विकासाची दूरदृष्टी असलेला असा एक लोकनेता नियतीने हिरावून नेल्याची भावना विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या नेत्याला त्यांनी अशा प्रकारे भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वाचा संपूर्ण पोस्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com