
मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी पुढील 24 तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हाहाकार माजवला असून, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा: राज्यात पावसाचे तुफान! नांदेड, लातूरला झोडपलं, शाळांना सुट्टी जाहीर
मराठवाडा आणि विदर्भात पुराचे थैमान
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. या जिल्ह्यामध्ये 13 रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत 4279 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, तब्बल 43 गावांचा संपर्क तुटला आहे. नायगाव, कंधार, लोहा, उमरी, बिलोली, नांदेड, किनवट या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ, सीआरपीएफ, अग्निशमन दल आणि पोलिस क्यूआरटी पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
रात्रीपासून #नांदेड जिल्ह्यात #अतिवृष्टी झाली आहे. नदी, नाले यांना #पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटून #पाणी शिरले आहे. खबरदारीचा #इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. नागरिकांनी अतीआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये-जिल्हाधिकारी @rahul_kardile2 @MahaDGIPR pic.twitter.com/7ClcKpu4YT
— District Information Office, Nanded (@InfoNanded) August 29, 2025
लातूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. येथे 54 रस्ते पाण्याखाली गेले असून, मांजरा, निम्न तेरणा, रेणापूर, खरोळा, जवळगा, तावरजासह एकूण 27 साठवण तलाव पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. थोडगा, हसरणी, बेलसंगवी आणि चापोली येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी अहिल्यानगर येथून लष्कराचे एक पथकही रवाना करण्यात आले आहे. लातूरमधील काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर अडकलेल्या एका व्यक्तीला स्थानिक पथकांनी यशस्वीरीत्या वाचवले.
नक्की वाचा: मनोज जरांगे मुंबईत! शहरातील 'हे' रस्ते पूर्णपणे बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर
पालघर जिल्ह्यातील विरार येथे रमाबाई अपार्टमेंट नावाची एक चार मजली इमारत कोसळली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफची दोन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी अथक प्रयत्न करून 26 नागरिकांना बाहेर काढले. यात 17 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जण जखमी झाले. एनडीआरएफने बचाव आणि मदत कार्य संपल्याचे सांगितले आहे.
नांदेडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
गेल्या 24 तासांत नांदेडमध्ये सर्वाधिक 132.7 मिमी पावसाची नोंद झाली, त्या खालोखाल लातूरमध्ये 91.8 मिमी. या पावसामुळे राज्यभरात एकूण 6 जणांचा मत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे 42 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क साधला जात आहे अशी माहिती देण्यात आलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world