जाहिरात

मी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली! जळगावमध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये तुफान धुमश्चक्री सुरू

पुण्यात (Pune Municipal Corporation Election 2026) भाजपविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. तर जळगावमध्ये (Jalgaon Municipal Corporation Election 2026) शिवसेना विरूद्ध भाजप संघर्षाला तोंड फुटले आहे. 

मी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली! जळगावमध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये तुफान धुमश्चक्री सुरू
जळगाव:

मंगेश जोशी

"आमचं ठरलंय" असं म्हणणाऱ्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला या कुरबुरीसंदर्भात कुजबूज ऐकू येत होती, मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही कुरबूर, नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली जाऊ लागली आहे.  महायुतीतील घटक पक्षांमधील वाद आता बंद दाराआड राहिलेला नसून तो थेट व्यासपीठावरून जाहीरपणे व्यक्त होऊ लागला आहे. जळगावचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या आमदाराविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात बोलताना अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्याबद्दल पश्चाताप होत असल्याचे विधान केले होते.  यावरून पुण्यात भाजपविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. तर जळगावमध्ये शिवसेना विरूद्ध भाजप संघर्षाला तोंड फुटले आहे. 

नक्की वाचा: भाजप उमेदवारांकडून ओवाळणीतून मतदारांना पैसे वाटप? काँग्रेसच्या आरोपाने खळबळ

दहशतीला भीक घालत नाही!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे जळगावमधील एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनले असून एकमेकांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. किशोर पाटील यांनी मंगेश चव्हाण यांचे नाव न घेता जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान टीका केली. त्यांनी म्हटले की," या महाराष्ट्रात काही लोकांची अशी हवा आहे की कोणी त्यांच्याविरोधात बोलायलाच तयार नाही. प्रश्न इतकाच होता की मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल? पण किशोर अप्पा पाटीलने तुमच्या मदतीने गळ्यात नुसती घंटाच बांधली नाही तर तुम्ही लोकांनी त्याला इतका बदडला की त्याचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला. दंड थोपटला आणि दंड थोपटल्याचा पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात गेला.  मला इतका अभिमान वाचतो की मी कुठेही गेलो की समोर येणारा माणूस दंड थोपटूटन मला ती आठवण करून देतो. दंड थोपटणे ही किरकोळ गोष्ट नव्हती. मला बरेच जण सांगतात की त्यांच्या कशाला नादी लागतो, ईडी-फिडी, कोणाच्या चौकशा लागतील, जेल होईल. मी त्यांना सांगितलं की या किशोर अप्पाने 2 वर्ष जेलच्या बाहेर नोकरी केली आहे.  श्रीकृष्णाचाही जन्म जेलमध्येच झाला होता.   

नक्की वाचा: हातावर NCP उमेदवाराचे नाव लिहीत आत्महत्या, फारूख शेख अडचणीत येणार?

अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय, रवींद्र चव्हाणांची टीका

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी तापदायक ठरेल असे अनेकांनी आपल्याला सांगितले होते आणि ही बाब आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती असे चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये म्हटले होते. पवार यांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होत आहे असे विधानही त्यांनी केले होते.  

अजित पवार यांनीही शांत न बसता भाजपवर टीका केली.  "पुणे महापालिकेत सत्ता असताना भाजपने केवळ वेळकाढूपणा केला. विकासाच्या नावावर शून्य काम झाले आहे. आता पुण्याला या कारभारी त्रिकुटातून मुक्त करण्याची वेळ आली आहे," असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले. दुसरीकडे, उदय सामंत यांनी भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केल्याचे म्हटल्यामुळे युतीमधील दुरावा अधिकच स्पष्ट झाला आहे. राज्यातील मंत्रिमंडळात तीनही पक्ष एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर हे तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांचे वाभाडे काढू लागले आहेत.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com