Raj Thackeray News: विधानसभा निवडणुकीत जे घडलं ते विसरून जा, नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखड मत व्यक्त करत मनसैनिकांना नव्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. एक्स माध्यमावरील त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
राज ठाकरेंची खास पोस्ट त्यांच्याच शब्दात...
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं.
या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील.
मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच.
पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा. महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा.
थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा. लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world