स्वानंद पाटील, बीड
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. बजरंग सोनावणे यांनी हा दावा फेटाळत अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी अजित पवार यांच्या बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आहेत का? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
माझा केज येथील कारखाना अडचणीत आहे. त्यामुळे मी म्हणतोय की पदरात घ्या, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. माझ्या साखर कारखान्याचे उसाची बिले मी वेळेत देत आहे. माझा कारखाना चांगला सुरु आहे. तसं काही असतं तर प्रवाहाच्याविरोधात जाऊन शरद पवारसाहेबांसोबत गेलो नसतो, असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलं.
(वाचा- बारामतीचे 'दादा' बदला!, विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना रंगणार?)
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. अमोल मिटकरी यांनी आवाक्याच्याबाहेर जाऊन त्यांनी बोलू नये. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बदनाम करु नये. खासदारावर बोलण्याआधी अमोल मिटकरींनी ग्रामपंचायत सदस्य तरी निवडून आणला आहे का? हे दाखवावे, अशी टीका बजरंग सोनावणे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, "बीडमधील एका बप्पांचा अजितदादांना सकाळी फोन आला होता. दादा मला आता संकटातून वाचवा असं ते म्हणत होते. त्या अनुषंगानेच मी ते ट्वीट केलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रात जनतेची कामे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खूप बदनामी केली, खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला."
(नक्की वाचा- महाराष्ट्रातील नेता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी? कोणकोणत्या नावांची चर्चा?)
"मात्र विजयोत्सव साजरा करणारे नेते जेव्हा अजितदादांना विचारतात की आमचं भविष्य कसं? त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यासोबत आहे, जे नेते तळागळातील लोकांसाठी काम करतात", असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world