जाहिरात

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी मार्च 2026 ची डेडलाईन? नितीन गडकरी म्हणाले...

Mumbai-Goa Highway : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  मार्च 2026 या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्त सूचना त्यांनी केली आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी मार्च 2026 ची डेडलाईन? नितीन गडकरी म्हणाले...

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Mumbai-Goa Highway :  मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष रखडलं आहे. त्यात सर्वाधिक काम हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्याचं राखडलं आहे. आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्याचं काम राखडलं आहे, या कामासाठी ठेकेदारांना अजून मुदतवाढ हवी आहे. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च 2026 या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्त सूचना त्यांनी केली आहे.  गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे सरकारला विरोधक आणि जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे केंद्रासह राज्याचे मंत्र्यांनी या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी दौरे केले. 

अनेक मंत्र्यांनी दौरे केले, पाहणी केली, परंतु हा मार्ग काही पूर्ण होत नाही. दिलेल्या अनेक डेडलाईनही निघून गेल्या. त्यात सर्वाधिक काम हे संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्याचं काम वर्षानुवर्षे रखडलं आहे. विशेष करून आरवली ते कांटे हा 39 किमीचा टप्पा आहे. सुमारे 692 कोटीचे हे काम आहे. परंतु अजून ते अपूर्णच आहे. तर दुसरा टप्पा कांटे ते वाकेड हा 49 किमीचा असून त्याचे अंदाजपत्र 800 कोटीचे आहे. दोन्ही टप्प्यांचे काम अजून अपूर्ण आहे. काम लांबल्याने मुळ अंदाजपत्रकापेक्षा सुमारे 30 टक्के कामात वाढ होणार आहे. अंदाजित दोन्ही टप्प्यांना प्रत्येकी 250 ते 300 कोटी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे.आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे सरकारचा प्रयत्न आहे.  

(नक्की वाचा - CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर! घरांची किंमत 25 ते 30 टक्कांनी कमी होणार?)

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांची नुकतीच दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये गडकरी यांनी ठेकेदारांची कान उघडणी केली आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपलं अधिक लक्ष असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान रखडलेल्या दोन्ही टप्प्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदरांनी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. परंतु गडकरी यांनी मागणी फेटाळून लावली आणि आहे त्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे मंत्री गडकरी यांनी सक्त सूचना दिल्याने आता अपूर्ण राहिलेलं हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(नक्की वाचा- Jan Suraksha Bill : राज्यात 'त्या' 64 संघटना! मुख्यमंत्र्यांनी सांगितली शहरी नक्षलवादाची पद्धत)

आमदार शेखर निकम रखडलेल्या कामावर अधिवेशनात मांडला मुद्दा

"आमचा महामार्ग पूर्णच ब्लॅक स्पॉट आहे! अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विधानसभेत आवाज उठवला. या महामार्गामुळे कोकणवासीयांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी सरकारसमोर अधोरेखित केल्या. महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या अर्धवट कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण मार्गच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा 'ब्लॅक स्पॉट' झाला आहे. अंडरपासच्या अभावामुळे निर्माण झालेली आंदोलनेही त्यांनी अधिवेशनात मांडली. बांधकाममंत्र्यांनी स्वतः महामार्गावर गाडीतून फिरून काही 'ब्लॅक स्पॉट' पाहिले आहेत. पण आमचा हा संपूर्ण महामार्गच एक अखंड 'ब्लॅक स्पॉट' आहे, असं आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रश्न केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याचं मतही त्यांनी यावेळी मांडलं. दरम्यान महामार्गाच्या कामाबाबत लवकरच आमदारांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com