Mumbai Traffic Police E Challan: मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरात नो-पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत, म्हणजेच आठवड्याभरात 23,000 हून अधिक वाहन चालकांना ई-चलन धाडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या चालकांकडून तब्बल 2.74 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे.
नक्की वाचा: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठून कुठपर्यंत धावणार?
ई-बाईकवाल्या फूड डिलिव्हरीवाल्यांवर विशेष नजर
गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरांत फूड डिलिव्हरी करणारे सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे. खासकरून ई-बाईकवरून फूड डिलिव्हरी करणारे सिग्नल तर मोडतातच शिवाय राँग साईडने गाडी चालवले, फूटपाथवरून गाडी चालवणे असेल प्रकारही करत असल्याचे दिसून आले होते. आतापर्यंत वाहतूक पोलीस याकडे काणाडोळा करत होते. ई-बाईकवरून फूड डिलिव्हरी करणाऱ्यांविरोधात नागरिकांनी बऱ्याच तक्रारी केल्यानंतर उशिराने का होईना पण पोलिसांनी ई-बाईकवाल्यांवरही कारवाईला सुरूवात केली आहे.
नक्की वाचा: ठाणे-बोरिवली 23 किमीचा प्रवास आता फक्त 15 मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण
पोलिसांनी जप्त केल्या 517 बाईक
25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांत ई-बाईक चालकांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. नियम मोडल्याची एकूण 671 प्रकरणे या तीन दिवसा नोंदवण्यात आली. पोलिसांनी कारवाईदरम्यान 517 ई-बाईक जप्त केल्या आहेत. पोलिसांना या कारवाईमध्ये बहुसंख्य ई-बाईक चालकांनी हेल्मेटच घातले नसल्याचे दिसून आले. या सगळ्यांना दंड़ ठोठावण्यात आला आहे. काही चालक हे बाईकवरून जात असताना फोनवर बोलताना दिसून आले. वाट्टेल तशा बाईक पार्क केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचेही पोलिसांना दिसून आले असून पोलिसांनी अशा बाईक चालकांवरही कारवाई केली आहे. यापुढे नियमांकडे दुर्लक्ष करत गाड्या पिरगळल्या तर यापेक्षाही कठोर कारवाई करू असा इशारा वाहतूक पोलिसांनी डिलिव्हरी कंपन्यांना आणि ॲग्रीगेटर कंपन्यांना दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या चालकांना सुरक्षिततेचे नियम समजावून सांगावेत, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world