
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्हयातील माहूर येथे भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या सर्वांवर सध्या माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड जिल्हयातील माहूर येथे भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली . सर्वावर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहुर येथे ठाकूर बुवा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात.
हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील दिंडी यात्रेसाठी आली होती. काल एकादशी असल्याने रात्री या दिंडीतील भाविकांनी भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाली. पहाटे त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आता सर्व रुग्णाची प्रकृती बरी असून सायंकाळ पर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.
दरम्यान, राज्यामध्ये उपवास, धार्मिक कार्यक्रम तसेच एकादशीला प्रामुख्याने भगर बनवतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून भगरीमधून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोंदट वातावरणामुळे भगरीला बुरशी येण्यास सुरुवात होते, त्यामुळे भगरीमधून विषबाधा होण्याचा धोका वाढला आहे. याआधीही अनेकदा भगरीमधून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
नक्की वाचा - Walmik Karad: वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world