जाहिरात

Nashik News : काल डान्स, आज भाजपचा चान्स! नाशिकमध्ये मनसे-उबाठाला मोठा धक्का; एका रात्रीत बदलली निष्ठा

Nashik News : काल रात्रीपर्यंत जे नेते ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद साजरा करत होते, पेढे वाटत होते आणि ढोल-ताशांच्या गजरात मनसोक्त डान्स करत होते, त्यांनी अवघ्या 24 तासांत आपली निष्ठा बदलली आहे.

Nashik News : काल डान्स, आज भाजपचा चान्स! नाशिकमध्ये मनसे-उबाठाला मोठा धक्का; एका रात्रीत बदलली निष्ठा
Nashik News : नाशिकच्या राजकारणात 24 तासांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
नाशिक:

Nashik News : राजकारणात कोणाचा पाय कशात आणि कोण कधी कोणाच्या गोटात असेल, याचा अंदाज बांधणे सध्या कठीण झाले आहे. काल रात्रीपर्यंत जे नेते ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद साजरा करत होते, पेढे वाटत होते आणि ढोल-ताशांच्या गजरात मनसोक्त डान्स करत होते, त्यांनी अवघ्या 24 तासांत आपली निष्ठा बदलली आहे.

नेमकं काय घडलं?

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच नाशिकमध्ये हा प्रकार घडला आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं बुधवारी (24 डिसेंबर) ठाकरे बंधुंनी युती केली. त्यांनी मुंबईत युती जाहीर करताच नाशिकमध्ये नसेच्या गोटात उत्साहाचे उधाण आले होते.

मनसे नेते दिनकर पाटील, यतीन वाघ आणि उबाठा गटाचे विनायक पांडे यांनी एकत्र येत जोरदार सेलिब्रेशन केले. पेढे वाटले गेले आणि विजयाचा गुलाल उधळत या नेत्यांनी डान्सही केला. कार्यकर्त्यांना वाटले की आता नवी युती नवी समीकरणे मांडणार, पण तो डान्स आणि तो आनंद केवळ 24 तासांचा ठरला. बुधवारी जल्लोष करणारे हेच नेते आज (गुरुवार) गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

(नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट! समन्वय समितीच्या पत्रावर फक्त एकाचीच सही, नेमकं काय शिजतंय? )

विरोध झुगारून कमळ हाती

या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. आपल्याच पक्षातील निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना भाजपच्या गोटात होती, मात्र आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने हा विरोध झुगारून दिला. 'जो जिंकेल त्याला पक्षात घ्या' या रणनीतीनुसार विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील या तिघांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला.

विनायक पांडे हे नाशिकमधील अत्यंत आक्रमक नेते मानले जातात. 2006 ते 2009 या काळात ते ठाकरेंच्या शिवसेनेचे महापौर होते. पक्षफुटीनंतरही ते ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे होते, पण आता त्यांनी कमळ हाती घेतले आहे. दुसरीकडे, यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर होते. व्यवसायाने वकील असलेल्या वाघ यांचा नाशिकमध्ये मोठा प्रभाव आहे. तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सातपूर परिसरात पाटील यांचे मोठे वर्चस्व असून, त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : ठाकरेंच्या सेनेत 'पुत्रकल्याण'! नेत्यांच्या मुलाची तिकीटासाठी धावपळ, वाचा सर्व यादी )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com