
Nashik News : आज देशभरात राखीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज बहीण भावाला राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त करते आणि भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भावा-बहिणीमधील प्रेमाचं नातं साजरा करण्याचा हा दिवस. रुसवे-फुगवे विसरून भाऊ-बहीण एकत्र येतात. मात्र नाशिकमध्ये मात्र एका चिमुरड्या बहिणीला आपल्या मृत भावाला राखी बांधण्याची वेळ आली. ते दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं. ती लहान बहिणही ओक्साबोक्सी रडून भावाला राखी बांधत (Raksha Bandhan 2025) होती. तो भाऊ तिला आता परत कधीच दिसणार नाही.
नाशिकच्या वडणेर दुमाला गावात बिबट्याच्या हल्ल्याने एक चिमुकला आयुष भगत कायमचा दूर गेला. आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या 9 वर्षांच्या बहिणीने मृत भावाच्या हातावर राखी बांधून अश्रूंनी निरोप दिला. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. (Nashik Raksha Bandhan 2025 News)
नक्की वाचा - Raksha Bandhan 2025: हृदयस्पर्शी रक्षाबंधन! बहिणीने जग सोडलं, तरी तिच्याच हाताने राखी बांधली; हे कसं घडलं?
नेमकं काय घडलं?
राखीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शुक्रवारी भगत यांच्या कुटुंबासोबत अघटित घडलं. शुक्रवारी रात्री गावात भीषण घटना घडली. ३ वर्षांचा आयुष भगत घरासमोर खेळत असताना बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेले. काही वेळातच घराजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी आज रक्षाबंधन. बहिणीने भावाला राखी बांधून सण साजरा करायचा होता. आयुषची बहीण पण आनंदात होती. आधीच भावाला राखी घेऊन ठेवली होती. पण भावाच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्याच्या थंडगार हातावर राखी बांधण्याची वेळ या बहिणीवर आली.

या क्षणी अख्खं गाव रडत होतं. सुखाचा हा सण दुःखाचा झाला. एका बहिणीचं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलं आहे. आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण गावकऱ्यांच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही. गावात भीतीचं सावट पसरलं आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world