जाहिरात

"एक बँक बुडवणारा, दुसरा दारू विकणारा", नवनीत राणांचा शिंदे आणि ठाकरेंच्या उमेदवारांवर निशाणा

बुंदिलेंच्या प्रचारासाठी रवी राणांच्या सभांच्या धडाका सुरू असतानाच आता भाजप नेत्या, स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

"एक बँक बुडवणारा, दुसरा दारू विकणारा", नवनीत राणांचा शिंदे आणि ठाकरेंच्या उमेदवारांवर निशाणा

शुभम बायस्कार, अमरावती

भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी हकालपट्टी केलेल्या माजी आमदार रमेश बुंदिलेसाठी दर्यापूर विधानसभेत प्रचार सभांचा धडाका लावलाय. या सभांमधून माजी खासदार आनंद अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ या पितापुत्रांवर नवनीत राणांकडून जोरदार टीका केली जात आहे. राणांनी आता आपल्या टिकेचा मोर्चा थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे वळवला आहे.  

उद्धव ठाकरेंनी दर्यापूर विधानसभेत ज्या उमेदवाराला तिकीट दिलं आहे, त्या उमेदवाराचा व्यवसाय हा दारू विक्रीचा आहे. अशा उमेदवाराला मत दिले तर गावागावात पाईपलाईनद्वारे दारू विक्री होईल, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तर एक बँक बुडवणारा आणि दुसरा दारू विकणारा उमेदवार असताना काय निवडावं याचा निर्णय महिलांना घ्यायचा आहे, असं भावनिक आवाहन नवनीत यांनी केल आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीच्या दर्यापुरात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ हे मैदानात आहेत. तर त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे हे उमेदवार आहेत. दर्यापुरात दोन्ही शिवसेनेमध्ये काट्याची टक्कर होत आहे. अशातच युवा स्वाभिमान पक्षाकडून भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

(नक्की वाचा - एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल; आचारसंहिता भंग केल्याचं प्रकरण)

बुंदिलेंच्या प्रचारासाठी रवी राणांच्या सभांच्या धडाका सुरू असतानाच आता भाजप नेत्या, स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागात सभा घेत रमेश बुंदिले यांना निवडून देण्याचा आवाहन त्या मतदारांना करत आहेत. हे आवाहन करत असतानाच अडसूळ पिता-पुत्राचा त्या जोरदार समाचार  घेत असल्याचे पहायला मिळत आहे. 

अडसूळ पिता-पुत्रांवर निशाणा

आनंद अडसूळ व अभिजीत अडसूळ यांचा नवनीत राणाकडून मुंबईचे पार्सल, चार फुट्या आणि दीड फुट्या असा उल्लेख करण्यात आला. अडसुळांवर 900 कोटींच्या बँक घोटाळ्यांचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. 'राणा आणि अडसूळ' हे दोन्ही महायुतीचे घटक आहेत. या दोघांच्याही वादामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढणार असल्याची स्थिती आहे. असे असतानाच नवनीत राणांनी अडसूळ पिता-पुत्रानंतर आपला मोर्चा थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवलाय. 

(नक्की वाचा - दिवसभर सलाईन, रात्री पुन्हा प्रचार सभा; इम्तियाज जलील यांचा 'तो' फोटो व्हायरल)

दर्यापूर मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार दिला आहे, त्यांचा व्यवसाय दारू विक्रीचा आहे. त्या उमेदवाराला जर मते दिली तर पाईपलाईन लावून गावापर्यंत दारू विक्रीचे काम होईल. अमरावती जिल्ह्यात अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी मी आवाज उचलते आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार दिलाय त्या माध्यमातून महिलांचे भविष्य आणि त्यांच्या मुलांच्या डोक्यावरचा बापाचा हात उठवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अशा शब्दात नवनीत राणा यांनी ठाकरेंचा समाचार घेतला आहे. एक बँक बुडवणारा आणि दुसरा दारू विक्री करणारा आहे. त्यामुळे काय निवडावं याचा निर्णय मतदारांना करायचा आहे, असं भावनिक आवाहन देखील नवनीत राणा यांनी महिलांना केलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com