
निलेश बंगाले, वर्धा: संच मान्यतेबाबत राज्य सरकारने 15 मार्च 2024 ला घेतलेला निर्णय शासकीय शाळा बंद पाडत खासगी शाळांना पाठबळ देण्याचे षडयंत्र आहे. पण तो निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा यासाठी आम्ही अनोखे आंदोलन राज्यभर करणार असून त्याची सुरूवात वर्धा जिल्ह्यातून केली जाणार असल्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेतून स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले बच्चू कडू?
"एकीकडे शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत सर्वांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. पण सरकार स्वतःच या कायद्याचे उल्लंघन करत आहे. संबंधित शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा या मागणीसाठी ‘आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही' असे फलक प्रत्येक शिक्षक आपल्या घरावर लावणार आहे. या आंदोलनाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातून केली जाणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे यासाठीही पाहिजे तसे प्रयत्न शासन स्तरावरून होताना दिसत नाही. पण कृषीमंत्र्यांची गरज काय असा प्रश्नही यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
"शेतक-यांना 448 रुपये टन प्रमाणे युरिया विक्री होतो. तर देशातील खत कंपन्यांना प्रती टन 1500 रुपये सबसीडी सरकार देत आहे. यात मोठा गौडबंगाल असून 2 लाख कोटी रुपये देशातील खत कंपनींना दिल्या जात आहे. इतकेच नव्हे देशातील सात पेट्रोलियम कंपन्यांना गत पाच वर्षांत 7 लाख कोटींचा नफा झाला आहे. तर देशातील शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी केवळ 75 हजार कोटींची गरज आहे. पण सरकार शेतक-यांना कर्जमुक्त करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टिकाही यावेळी बच्चू कडू यांनी केली.
(नक्की वाचा- पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल शंका
"आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही याबद्दल शंका आहे. मुंबईसारख्या शहरात मराठी मतदारांची टक्केवारी कमी करण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, भाजपची युती होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरचा नारा दिला जात असून हेही एक षडयंत्र असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
अपयश लपवण्यासाठी तिरंगा यात्रा
दरम्यान, "केंद्र सरकार आपले अपयश लपवण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्याचे नाटक करत आहे. जम्मू-काश्मिरमध्ये 27 पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले. यासाठी आपली कमकुवत ठरलेली गुप्तचर यंत्रणा जबाबदार आहे. यावर कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. तर हल्लेखोर दहशतवाद्यांना अद्याप पकडण्यात आलेले नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची चांगली संधी होती. पण केंद्र सरकारने तीही गमावली. दहशतवाद्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानवर हल्ला चढवून संपूर्ण पाकिस्तान काबीज करून तो भारतात सामिल केला पाहिजे. ही भारतातील जनतेचीही भावना आहे. आता तिरंगा यात्रा काढून भाजपचे लोक काय सिद्ध करू इच्छितात, असा टोलाही बच्चू कडू यांनी भाजपला लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world