यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Crime: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात क्षुल्लक कारणावरुन मारामारी, जीवघेणे हल्ले, खून केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशीच धक्कादायक घटना शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मांजरीने पोपटाचा पिंजरा पाडल्याने दोन कुटुंबांमध्ये तुफान मारामारी झाल्याचे समोर आले आहे.
मांजर, पोपटामुळे तुफान राडा!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांजरीने पोपटाचा पिंजरा पाडला म्हणून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यामध्ये ताडीवाला रस्त्यावरील भारत तरुण मंडळासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोपटाच्या मालकाला मारहाण केल्याप्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिषेक सिंग यांचे पुण्यातील ताडीवाला रस्त्यावर घर आहे.त्यांच्या शेजारी आरोपी दिनेश रंगराव पोताबत्तोनी याचेही घर आहे. आरोपी दिनेश याने आपल्या घरात मोठा मांजर पाळला आहे. तर अभिषेक सिंग यांनी पोपट पाळला आहे. आरोपी दिनेश पोताबत्तोनी याचे मांजर नेहमी अभिषेक सिंग यांच्या पोपटाचा पिंजरा पाडत होता, यावरुनच त्यांच्यामध्ये वाद होत होता.
दोन कुटुंबामध्ये हाणामारी
घटनेवेळीही आरोपीच्या मांजराने फिर्यादीच्या पोपटाचा पिंजरा पाडला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. पिंजरा पाडल्यानंतर अभिषेक सिंग याने दिनेशला मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. याचाच दिनेश पोताबत्तोनीला राग आला. याच वादातून त्यांनी अभिषेक सिंग यांच्यासह कुटुंबियांना मारहाण केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world