
राकेश गुडेकर
ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनी विरोधात यवतमाळ जिल्ह्यात 39 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर आता चिपळूणमध्ये देखील बहिण भावाची 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक कंपनीकडून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कंपनीच्या चार जणां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रतिक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीची घटना जानेवारी 2023 पासून आजपर्यंत घडली आहे.
TWJ कंपनीचे कार्यालय चिपळूण शहरातील इंटक भवन इथं आहे. तिथूनच कंपनीचा कारभार चालतो. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनी त्यांची कंपनी TWJ असोसिएट्सचे प्रतिनिधी म्हणून करत आहेत. त्यांनी या माध्यमातून संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांच्यामार्फत प्रतिक माटे यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी गुंतवणुकीवर दर महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा देण्याचं मोठं आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडून प्रतिक माटे यांनी स्वतः 3 लाख 50 हजार रुपये गुंतवले.
शिवाय त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांनी 25 लाख रुपये कंपनीत गुंतवले. दोघांनी मिळून असे एकूण 28 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली. जानेवारी 2023 पासून ते आजपर्यंत ही गुंतवणूक करण्यात आली. मात्र, मे 2025 नंतर कंपनीने त्यांना कोणताही परतावा दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांची मूळ रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाईल. अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे टीडब्ल्यूजे या कंपनीमध्ये पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, ठेकेदार, मोठमोठे व्यापारी अशा हाय प्रोफाईल लोकांनी करोडो रुपये गुंतवल्याची चर्चा आहे.
टीडब्ल्यूजे कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा देते, असे सुरुवातीला सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात 1 लाखाला महिन्याला 7 टक्के, नंतर 6, काही महिन्यांनी 5, त्यानंतर 4 व 3 टक्के दराने व्याज गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होत होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांनी दामदुप्पट फायदा देखील घेतला. आपली गुंतविलेली रक्कमदेखील वसूल केली. हा विश्वास बसल्याने टीडब्ल्यूजेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा ओढा वाढला. पुढे गुंतवणूक मोठी होत गेली. त्यामुळे हजार ते बाराशे कोटी रूपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता संबंधित कंपनीच्या सीएमडीवर गुन्हा दाखल झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. कंपनीच्या टीडब्ल्यूजे इव्हेंट, टीडब्ल्यूजे इन्फ्रा, टीडब्ल्यूजे हॉस्पिटॅलिटी, टीडब्ल्यूजे लर्निंग, टीडब्ल्यूजे लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या आहेत. येथेही गुंतवणूकदारांचा पैसा गुंतविला जातो. त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून मासिक तीन ते चार टक्के रक्कम व्याज दिले जाते, असे आमिष लोकांना दाखविण्यात आले होते. या आमिषाला भुलून अनेकांनी या कंपनीत पैसे गुंतवले. आता मात्र या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world