
शरद सातपुते, सांगली: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी कर्जमाफीवर बोलताना पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता.. असे विधान केले. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे दुसरीकडे महायुतीचेच नेते सदाभाऊ खोत यांनीही या विधानावरुन निशाणा साधला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
"जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारणी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांच्या लग्नात करतात..." अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी माणिकराव कोकाटेंच्या विधानावरुन टीका केली आहे.
तसेच "अंगामध्ये जॅकेट घालून एक किलोमीटरचा फेट्याचा तुरा काढून ते सगळे गब्बरसिंग अत्तर मारून स्वागताला थांबत असतात. अगदी इंद्रदेव अवतारावे असे अवतारतात. त्यांच्या लग्नाच्या मंडपाबद्दल कोणी बोलत नाही आणि शेतकऱ्याच्या लेकराबाळांनी लग्न केली की तुमच्या पोटामध्ये नऊ महिन्याच्या कळा सुटायला लागतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या बाबतीत बोलत असताना सगळ्यांनी तारर्तम्य पाळावे," असेही सदाभाऊ खोत म्हणाले. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.
(नक्की वाचा MNS News : मराठी भाषेवरून मनसे आक्रमक, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी)
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री आणि या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे. असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चित पणे दिली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
काँग्रेसचाही संताप
दुसरीकडे, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world