शरद सातपुते, सांगली:
Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील करोली टी या गावात अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली( टी ) गावात घडली आहे. हा प्रकार चक्क खून होऊन अंत्यसंस्कार झाल्यानंतर तब्बल आठ, नऊ दिवसांनी उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर तसेच मयताची दोन्ही मुले या चार जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
भारत इराप्पा कर्पे (वय ५८) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी निलाबाई भारत कर्पे (वय ५०) आणि तिचा प्रियकर बाबाजी गोविंद कर्पे (वय ४२), मनोज भारत कर्पे ,अनिकेत भारत कर्पे असे संशयित आरोपींची नावे आहेत. निलाबाई कर्पे व बाबाजी कर्पे यांचे अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. दोघांच्या अनैतिक संबंधासाठी भारत कर्पे हे अडथळा ठरत होते.
या रागातून खुनाच्या दिवशी भारत यांना काठीने बेदम मारहाण करून गळा दाबून ठार केले होते, खुनाचा कोणालाही सुगावा लागू नये या हेतूने घरासमोरील खिडकीस ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकून ठेवून बनाव केला होता. या घटनेची कल्पना मनोज कर्पे व अनिकेत कर्पे या त्यांच्या दोन्ही मुलांना झाली. दोन्ही मुलांनी भारत कर्पे यांचा मृतदेह उतरून कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणला. वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत काढून आणल्याचे डॉक्टरांच्या पासून लपवून ठेवले व वडिलांचा मृत्यू दारू पिऊन झाला असे डॉक्टरांना सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांनी विच्छेदन करण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी तो न ऐकता वडिलांचा मृतदेह करोली( टी) येथे घेऊन गेले. व नातेवाईकांना बोलावून मृतदेह जाळून अंत्यविधी उरकण्यात आला आहे. प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी तिचा प्रियकर व दोन्ही मुलांच्यावर खून करून मृतदेह नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world