
शरद सातपुते, सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात सगळ्या वस्तूंच्या दराने सगळे विक्रम मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल वीस हजार रुपये इतका दर मिळाला. तर मानाचा नारळ तब्बल ४१ हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर समारोपाला पुरण पोळी दुध भात असा प्रसाद केला जातो. पुरण पोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात. यंदा तर सुमारे आठ हजार लोकांनी पुरण पोळीचा आस्वाद घेतला. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या विविध वस्तूंचा लिलाव दुसऱ्या दिवशी मंदिरात होतो. त्यातून मिळालेल्या पैशातून मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
या लिलावात सगळा गाव सहभागी होतो. यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चीत करण्यात आला होता. मात्र श्रद्धेतून या लिलावात मोठी चढाओढ लागली होती. त्यातून अनेक वस्तूंना मोठ्या रकमेची बोली लागली. लिलावात उत्तम चौगुले यांनी कोथिंबीर जुडी वीस हजारांना घेतली. गहू सुरेश आंबी यांनी बारा हजार रुपयांना, तांदूळ शिवाजी हवालदार यांनी तेरा हजारांना, हरभरा डाळ अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजारांना, चटणी संपत पाटील यांनी 17000 रुपयांना विकत घेतली.
तसेच विक्रम पाटील यांनी पडदे 1700 रुपयांना, तर मानाचा नारळ खरेदीसाठी मोठी चढाओढ लागली. त्यात गजानन पाटील यांनी बाजी मारत हा नारळ तब्बल 41 हजार रुपयांना खरेदी केला. या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले. हा लिलाव मोठ्या उत्साहात होतो. चढाओढ असली तरी त्यात श्रद्धा अग्रस्थानी असते.
Ganpati Visarjan 2025: उत्साहाला गालबोट! बाप्पाच्या विसर्जनावेळी राज्यात 7 जणांचा मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world