सुजीत आंबेकर, सातारा
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. मलकापूरात काँग्रेसला खिंडार पडलं असून कराड दक्षिणेत भाजपला पुन्हा बळ मिळालं आहे. मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, नगरसेविका स्वाती तुपे व माजी नगरसेविका अनिता राजेंद्र यादव यांच्यासह मलकापूरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुलबाबा भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिणेतून 616 चे लीड मिळवून देत, कराड दक्षिणमध्ये भाजपची ताकत दाखवून दिली होती.
(नक्की वाचा - आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास)
काँग्रेसच्या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला. त्यातच आता त्यांचे मलकापुरातील महत्वाचे शिलेदार बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे कराड दक्षिणेत काँग्रेसला खिंडार पडले असून पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
पक्षप्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, भारताचे सलग तिसऱ्यांचा पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी आज पक्षात प्रवेश केला. आपल्या सर्वांचे पक्षात स्वागत करतो. या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन आणि खोटारडेपणा करून मतदान मिळवले. मोदीजी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून मते मिळवली. पण या खोटेपणाला आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खोटारडेपणाला कंटाळून आपण काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश केला, याचा मला अभिमान आहे.
(नक्की वाचा - 'एवढी काळजी असेल तर राजीनामा द्या', अजित पवारांना आव्हाडांचं आव्हान)
कुणी-कुणी भाजपमध्ये प्रवेश केला?
शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लापा बामणे, मल्लिकार्जुन करपे, शंकर मेस्त्री, नंदू गायकवाड, सुरज पवार, अमित महाजन, कमलाकर माने, धनंजय माने, राजेंद्र डिंगणे, अमोल माने, शंकर सोनवणे यांच्यासह मलकापूर येथील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world