नागिंद मोरे
एका शालेय विद्यार्थी आपल्या मित्रासह शाळेसाठी घरातून निघाला. पण तो ना शाळेत पोहोचला ना परत घरी आला. त्यामुळे त्याचा सोबत नक्की काय घडलं असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अखेर सत्य काय ते समोर आले. जे काही समोर आले त्याने सर्वांनाच धक्का बसला. ही घटना धुळ्यातील कापडणे इथं घडली आहे. जो मुलगा घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला होता, त्याचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे पतंग उडवत असताना त्याचा मृत्यू झाला.
धुळे तालुक्यातील कापडणे येथील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा पतंग उडवत असताना मृत्यू झाला. तीन मजली इमारतीवर तो पतंग उडवत होता. त्यावेळी त्याचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. घरून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटूंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. रक्षित प्रभाकर पाटील असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर कापडणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कापडणे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात रक्षित प्रभाकर पाटील शिक्षण घेत होता. तो सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाला. यावेळी रस्त्याने जाताना रक्षितला आपले काही मित्र पतंग उडवत असल्याचे दिसले. यावेळी रक्षितही एका तीन मजली इमारतीवर आपल्या मित्रांकडे पोहचला. तिथेच तो पतंग उडवू लागला. याचवेळी धाब्यावरील स्लॅबचा मध्यभागी असलेल्या डगमध्ये अनावधानाने त्याचा तोल गेला. यात खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात रक्षितचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून कामावर मजूर आले नव्हते. म्हणून नजर चुकवत काही मुले टेरेसवर चडून पतंग उडवत होते. आपले मित्र पतंग उडवत असल्याच्या मोहात रक्षित ही टेरेसवर गेला. दुर्दैवाने या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रक्षित शाळेत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या आई जवळ बसून जेवला. त्यानंतर आईला मी शाळेत जातो असे सांगून रक्षित शाळेत जाण्यासाठी निघाला. मात्र रक्षितला वाटेतच मृत्यूने गाठले. यामुळे आई वडिलांना व कुटूंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world