![Sangli News : सांगलीत जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 12 वर Sangli News : सांगलीत जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 12 वर](https://c.ndtvimg.com/2025-02/gi3h8e2_gbs-virus-_625x300_12_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
शरत सातपुते, सांगली
गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मिरजेत मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा आणि 60 वर्षांच्या वृद्धेचा समावेश आहे. राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील 3 रुग्णांचा समावेश आहे.
शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये 'जीबीएस'चे रुग्ण आढळले होते. कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षांच्या तरुणाला 'जीबीएस'ची लागण झाली होती. त्याला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Political News : "मला हलक्यात घेऊ नका", एकनाथ शिंदेंचा इशारा कुणाला? राजकीय चर्चांना उधाण)
पुण्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर मुंबई, नागपूर, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णााचा मृत्यू झाला आहे.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
- अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
- अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे.
- डायरिया (जास्त दिवसांचा)
(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का?)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world