राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरीतील राजापूर शहरातील खर्ली नदीपात्रात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे नदीपात्रात पार्क केलेली अनेक वाहने अडकून पडली. पाण्यात अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्नही झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नदीच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी जमली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती पाहायला मिळते. मात्र बुधवारी भरतीच्या पाण्याने राजापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. भर दुपारच्या वेळी भरतीच्या पाण्याने जवाहर चौक परिसरातील खर्ली नदीपात्र भरुन गेले. त्यामुळे तेथे पार्क केलेली वाहने नदीपात्रात अडकून पडली. राजापूर शहराच्या पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहने कुठे पार्क करायची असा प्रश्न तिथे निर्माण होते. सुरक्षित जागा नसल्याने शहरात विविध कामासाठी येणारे नागरिक खर्ली नदीच्या पात्रात आपली वाहने पार्क करतात.
(वाचा - औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
आजही खर्ली नदीपात्रात काही चारचाकी वाहने उभी होती. त्यामध्ये अलिशान गाड्यांसह एक ट्रॅक्टर एक माल वाहतुकीची मोठी गाडी, एक रिक्षा आदी वाहनांचा समावेश होता. दरम्यान भरतीच्या पाण्याने नदीपात्र व्यापल्याने त्यामध्ये पार्क केलेली वाहने अडकून पडली होती.
गतवर्षी शहरातील महापुराच्या पार्श्वभूमीवर शहरातून वाहणाऱ्या उभय नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे नदीचे पात्र चांगलेच रुंद झाले असल्याने भरतीच्या वेळीही झटपट पाणी भरत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. काही दिवसांपूर्वीही असेच भरतीचे पाणी आले होते. त्यावेळीही त्या पाण्यावर वाहने तरंगताना पाहायला मिळाली होती.
( नक्की वाचा : वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन' )
सर्व धोक्यांची कल्पना असल्याने नगरपरिषद प्रशासनाने खर्ली नदी पात्राकडे जाणारा मार्ग बंद करुन तेथे सूचना फलक लावणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही न झाल्याने आणि नागरिकांनी सुरक्षित पार्किंग समजून नदीपात्रात वाहने पार्क केली. मात्र आतातरी स्थानिक प्रशासनाने खर्ली पात्राकडे जाणारा मार्ग बंद करुन संभाव्य भरतीच्या पाण्याबाबत सूचना देणारा फलक नदीपात्रात लावावे, अशीही मागणी आता नागरिकांकडून होत आहे.