Walmik Karad News : वाल्मीक कराड यांच्या बातम्या का पाहतो, म्हणून बीडच्या धारूर येथील तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं (Beed Crime News) नाव आहे. त्याच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात आणि वाल्मीक कराड यांच्या संदर्भातल्या बातम्या का पाहतो, म्हणून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहिते या तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मारहाणीमध्ये पीडित तरुणाच्या डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन मेंदूवर सूज आलेली आहे. पीडित व्यक्ती शुद्धीवर येण्यासाठी आणखीन दोन दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत.
नक्की वाचा - Palghar News : पालघरचा 'वाल्मीक कराड' कोण? जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी आमदाराचा संतप्त सवाल
त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्या आहेत. तर आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे मित्र आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमध्ये गुन्हेगारी वृत्ताच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world