लक्ष्मण सोळुंके, जालना
Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लहान दिरासोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला महिलाने संपवलं आहे. जालन्यातील सोमठाणा गावात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निकळज शिवारातील वाला-सोमठाणा तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला होता. मृतदेह मुरघासच्या प्लॉस्टिकच्या पोत्यात भरलेला होता. तसेच मृतदेह वर येऊ नये यासाठी त्याला मोठा दगड बांधला होता.
घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यावेळी हा मृतदेह सोमठाणा गावातील परमेश्वर राम तायडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. परमेश्वर तायडे यांचे वडील राम नाथा तायडे यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी मयताचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि पत्नी मनीषा परमेश्वर तायडे यांची विचारपूस केली. मात्र त्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांना अधिक माहितीसाठी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली त्यावेळी सत्य बाहेर आले. मनीषा (वय 28) आणि तिचा दीर ज्ञानेश्वर (वय 25) यांच्यात अनैतिक संबंध होते.
झोपेत कुऱ्हाडीने घाव घालत हत्या
दोघांच्या या प्रेमात परमेश्वर अडथळ ठरत होता. त्यामुळे मनीषा आणि ज्ञानेश्वर यांनी परमेश्वरला संपवण्याचा कट रचला. मध्यरात्री दोघांनी मिळून कुऱ्हाडीने परमेश्वरच्या डोक्यात आणि तोंडावर जोरदार वार केले. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह मुरघासच्या प्लॉस्टिकच्या पोत्यात भरला. पोत्याचे तोंड दोरीने घट्ट बांधले आणि पोत्यात दगड टाकून तो निकळज शिवारातील वाला-सोमठाणा तलावात फेकून दिला. गुन्ह्याची कबुली दोघांनी दिल्यानंतर, पोलिसांनी पत्नी मनीषा परमेश्वर तायडे आणि दीर ज्ञानेश्वर राम तायडे या दोघांनाही अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world